महायुतीच्या फुटीने पटेलांना तारले

By Admin | Updated: October 23, 2014 02:23 IST2014-10-23T02:23:11+5:302014-10-23T02:23:11+5:30

दक्षिण मुंबईतील मुस्लीमबहुल मतदार असलेल्या मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या अमिन पटेल यांनी पुन्हा एकदा काँग्रेसचा गड राखला आहे

Fleet saved the world over the greatness | महायुतीच्या फुटीने पटेलांना तारले

महायुतीच्या फुटीने पटेलांना तारले

चेतन ननावरे, मुंबई
दक्षिण मुंबईतील मुस्लीमबहुल मतदार असलेल्या मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या अमिन पटेल यांनी पुन्हा एकदा काँग्रेसचा गड राखला आहे. मात्र एकंदरीत मतांची आकडेवारी पाहिल्यास महायुतीच्या फुटीने पटेल यांना तारले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
अमिन पटेल या ठिकाणी विजयी ठरले असले, तरी २००९ सालच्या विधानसभा निवडणुकींच्या तुलनेत त्यांना या वेळी कमी मते मिळाली आहेत. पटेल यांना ३९ हजार १८८ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी कमकुवत उमेदवार दिला नसता, तर कदाचित येथील निकाल काहीसा वेगळा लागला असता. राष्ट्रवादीला या ठिकाणी दीड हजार मतांचा पल्लाही गाठता आला नाही. याउलट राष्ट्रवादीचे बशीर पटेल यांनी गेल्या निवडणुकीत समाजवादी पार्टीच्या तिकिटावर सुमारे २० हजार मते मिळवली होती. मात्र पटेल यांना यंदा कुलाब्यातून उमेदवारी देण्यात आली होती.
याउलट महायुतीत फूट पडल्याने भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने या ठिकाणी स्वतंत्र उमेदवार दिले होते. त्यात भाजपाच्या अतुल शाह यांना ३० हजार ६७५ आणि शिवसेनेच्या युगंधरा सालेकर यांना १५ हजार ४७९ मते मिळाली. गेल्या वेळच्या तुलनेत यंदा भाजपा आणि शिवसेनेच्या मतांत वाढ झाल्याचे दिसून आले. तरी या दोन्ही पक्षांच्या स्वतंत्र लढण्याचा फायदा थेट काँग्रेसला झाला.
मुंबईसह राज्यात की फॅक्टर ठरलेल्या आॅल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाने या ठिकाणी काँग्रेसला चांगलाच धक्का दिला होता. एआयएमआयएमच्या मोहम्मद शाहिद रफी यांनी या ठिकाणी १६ हजार १६५ मते मिळवली. ही विजयी मते ठरली नसली, तरी काँग्रेससोबत अन्य पक्षांना दखल घेण्याइतपत नक्कीच आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे येथील मुस्लीमबहुल मतदारांकडे पाहून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या ठिकाणी इम्तियाज अनिस हा मुस्लीम उमेदवार दिला होता. मात्र अनिस यांना काही खास चमक दाखवता आली नाही. मनसेने या ठिकाणी ३ हजार ६०१ मते मिळवली.
पटेल यांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी केलेल्या कामांमुळे मतदारांनी त्यांना आणखी एक संधी दिली आहे. १० हजार मतांहून अधिक फरकाने जिंकण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती. मात्र केवळ ८ हजार ५१३ मतांच्या फरकाने त्यांना विजय संपादन करता आला. याउलट बहुतेक मुस्लीम मते मिळवल्याचा दावा अतुल शाह यांनी केला आहे. शिवाय मुस्लीम अल्पसंख्याकांचा भाजपाला पाठिंबा मिळत असून आणखी काही काळ मिळाल्यास त्या पाठिंब्याचे रूपांतर मतांत करता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Fleet saved the world over the greatness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.