भटक्या कुत्र्यांच्या गणनेचा मार्ग मोकळा

By Admin | Updated: March 30, 2015 23:36 IST2015-03-30T23:36:16+5:302015-03-30T23:36:16+5:30

मुंब्य्रात भटक्या कुत्र्यांनी अडीचवर्षीय मुलाचे लचके तोडल्यानंतर शहरातील भटक्या कुत्र्यांचा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला आहे

Fleet the number of nook dogs | भटक्या कुत्र्यांच्या गणनेचा मार्ग मोकळा

भटक्या कुत्र्यांच्या गणनेचा मार्ग मोकळा

ठाणे : मुंब्य्रात भटक्या कुत्र्यांनी अडीचवर्षीय मुलाचे लचके तोडल्यानंतर शहरातील भटक्या कुत्र्यांचा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला आहे. आतापर्यंत ४० हजारांच्या आसपास भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाच्या शस्त्रक्रिया झाल्या असल्या असून अद्याप ७ ते १० हजार कुत्र्यांच्या शस्त्रक्रिया शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातही मुंब्य्रातील भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण शिल्लक असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे. परंतु, मागील वर्षी हाती घेतलेल्या कुत्र्यांच्या गणना करण्याचा प्रस्ताव आता मार्गी लागला असून येत्या काही दिवसांमध्ये ती होणार आहे. त्यानंतर, शहरात भटकी कुत्री किती आहेत, त्यातील नर, मादी किती, यांची सर्वच माहिती उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, जुलै महिन्यात घडलेल्या प्रकरणानंतर पालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील भटक्या कुत्र्यांची गणना करण्यासाठी एक प्रस्ताव तयार केला होता. आतापर्यंत केलेल्या शस्त्रक्रियांवर केंद्र शासनाच्या अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड यांच्याकडून २२ लाख ९२ हजार ६४० रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. परंतु, बोर्डाकडून ४ सप्टेंबर २०१३ रोजीच्या प्राप्त पत्रानुसार भटक्या कुत्र्यांची गणना झाल्याशिवाय अनुदान मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. डब्ल्यूएचओ संस्थेमार्फत जाहीर केलेल्या प्रचलित पद्धतीप्रमाणे स्थानिक लोकसंख्येच्या २-३ टक्के मोकाट श्वानांची अंदाजे संख्या गृहीत धरून ठाणे महापालिका हद्दीतील सध्या शस्त्रक्रिया झालेल्या व शिल्लक (नर, मादी, पिल्लेवाली) असलेल्या एकूण कुत्र्यांची संख्या निश्चित करता येत नव्हती. म्हणून आता गणना करून एकूण कुत्र्यांची संख्या निश्चित केली जाणार आहे.
अहमदाबादमध्ये यापूर्वी झालेल्या कुत्र्यांच्या गणनेमध्ये कुत्र्यांवर रंग लावून एक प्रकारची खूण केली गेली आहे. त्याच पद्धतीचा वापर ठाण्यातही केला जाणार आहे. या कामासाठी ८ लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यात नकाशे तयार करणे, गणना करण्याची सामग्री कर्मचाऱ्यांकरिता येणार होती. जीपीएस बेसद्वारे हे काम केल्यास त्यासाठी १० लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.
गणना करण्यासाठी खाजगी संस्थेद्वारे १०० कर्मचाऱ्यांचा स्टाफ उपलब्ध केला जाणार आहे. त्यांना दुचाकी दिल्या जाणार आहेत. प्रत्येक प्रभाग समितीत ३ ते ४ कर्मचारी याप्रमाणे दुचाकीवरून फिरून हे काम केले जाणार आहे. परंतु, पालिकेच्या तिजोरीत पैसा नसल्याने हा प्रस्ताव धूळ खात पडला होता. अखेर, आता हा प्रस्ताव मार्गी लागल्याचा दावा आरोग्य विभागाने केला असून येत्या काही दिवसांत त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाणार आहे.

Web Title: Fleet the number of nook dogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.