धोदाणीच्या डोंगरात चमकला लाल बत्तीचा दिवा
By Admin | Updated: January 27, 2015 22:36 IST2015-01-27T22:36:15+5:302015-01-27T22:36:15+5:30
माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या धोदाणी गावाने यापूर्वी पाहिली ती साधीशीच चारचाकी गाडी. तीही कधीतरीच फिरकणारी,

धोदाणीच्या डोंगरात चमकला लाल बत्तीचा दिवा
पनवेल : माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या धोदाणी गावाने यापूर्वी पाहिली ती साधीशीच चारचाकी गाडी. तीही कधीतरीच फिरकणारी, मात्र सोमवारी येथील आदिवासी बांधवांनी साधी गाडी नव्हे तर लालबत्तीची गाडी पाहिली आणि त्यांचा उत्साह कमालीचा वाढू लागला. जलयुक्त शिवाराच्या निमित्ताने धोदाणीत मंत्री, आमदारांचे पाय लागले आणि ग्रामस्थ दाटीवाटीने जमू लागले.
मालडुंगे ग्रामपंचायतीच्या हद्दीत मालडुंगे, धोदाणी, देहरंग, धामणी ही गावे, त्याचबरोबर हौशाचीवाडी, कुंभटेकडी, ताडपट्टी, सतीचीवाडी, टावरवाडी, चिंचवाडी, वाघाची वाडी, बापदेववाडी, कोंडीचीवाडी या वाडया येतात. यामध्ये धोदाणी शेवटच्या टोकाचे गाव. या भागात एकूण ४0९४ लोकसंख्या आहे. हे गाव आदिवासी बहुल असून अतिशय दुर्गम भागात येते. या ठिकाणी रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण यासारख्या पायाभूत सुविधांचा अभाव आहे. या गावात अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवत होते. शासकीय यंत्रणेचा या परिसराला परिचय नव्हता, परंतु सुमंत भांगे यांनी जिल्हाधिकारीपदाचा ताबा घेतल्यानंतर आदिवासी वाडया आणि पाडयावर विशेष लक्ष केंद्रित झाले.
मंडळ अधिकारी भाट यांचा वावर या भागात सातत्याने असतोच, मात्र जिल्हाधिकारी भांगे यांची या गावावर विशेष मर्जी बसल्याने धोदाणीकडे शासकीय यंत्रणेचे वरचेवर येणे सुरू झाले. प्रजासत्ताक दिनी आणि पूर्वसंध्येला तर या परिसरात वाहनांची गर्दी झाली होती. जलयुक्त शिवार अभियानासाठी या भागाची निवड केल्याने शुभारंभाला मुख्यमंत्री येणार म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी मालडुंगे आणि धोदाणीच्या शिवारात ठाण मांडले. त्यांना पाहण्याकरीता ग्रामस्थांनी गर्दी केली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा रद्द झाला आणि पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्या उपस्थितीत सोमवारी कार्यक्रम झाला. मेहता यांच्या रूपाने पहिल्यांदाच मंत्र्यांची स्वारी धोदाणीत आल्याने येथील ग्रामस्थांचा आनंद उतू जात होता. (वार्ताहर)