Join us

मोदक, लाडूच्या खरेदीसाठी झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2018 03:06 IST

बाप्पाच्या स्वागतासाठी भक्त सज्ज झाले असताना आरतीच्या वेळी लागणाऱ्या मोदक, लाडूच्या खरेदीसाठी भक्तांची झुंबड उडाली आहे.

मुंबई : बाप्पाच्या स्वागतासाठी भक्त सज्ज झाले असताना आरतीच्या वेळी लागणाऱ्या मोदक, लाडूच्या खरेदीसाठी भक्तांची झुंबड उडाली आहे. शहर आणि उपनगरातील ठिकठिकाणच्या बाजारपेठेत एक किलोपासून ते तब्बल २० किलो वजनापर्यंतचे महाकाय लाडू आणि मोदक बाजारात उपलब्ध आहेत.शहरातील लालबाग, परळ, दादरमधील तर उपनगरातील घाटकोपर, कुर्ला, माहिम, वांद्रे, विले पार्ले, अंधेरी, मालाड, बोरीवली या ठिकाणी गणरायाच्या सजावटीसाठी लागणाºया साहित्य खरेदीबरोबरच नैवद्यासाठी मिठाईची दुकाने फुलली आहेत. गेल्या दोन, तीन दिवसांपासून या ठिकाणी ग्राहकांची गर्दी झाली आहे. मिठाई बाजारात स्टॉबेरी, काजू, बटरस्कॉच, चॉकलेट काजू, चॉकलेट, गुलकंद काजू, केशर मावा, मँगो, डायफ्रुट, काजू असे विविध प्रकारचे आणि चवीचे मोदक उपलब्ध आहेत. मोदकासह मोतीचूर, सुपर लाडू, कडक लाडू, नरम बुंदी लाडू, महा लाडू, रवा लाडू, बेसण लाडू, चुरमा लाडू या लाडवांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. तसेच काजू कतली, पेढे, बदाम, अंजीर, पिस्ता बर्फी, नारळी पाक या मिठाईलाही अधिक मागणी आहे.मिठाई विक्रेते कमलाकर राकसे यांनी सांगितले की, सणाच्या निमित्ताने बाजारात गर्दी वाढली आहे. दुकानात वेगवेगळ्या आकाराचे आणि चवीचे मोदक, लाडू उपलब्ध आहेत. ग्राहक आपल्या पसंतीनुसार मिठाईची खरेदी करीत आहेत. मिठाई विक्रेता हरिश भदोरिया यांनी सांगितले की, गणपतीला नैवेद्य दाखविण्यासाठी मोदकांची खरेदी जास्त केली जात आहे. यात उकडीच्या मोदकांची खरेदी केली जात आहे. घराघरांत ‘मोदक-लाडू देवाला वाढू’, ‘नको नाव काढू तांदळाचे, केले मोदक लाल गव्हाचे’ या गाण्यांचे सूर ऐकू येत आहेत तसेच उकडीच्या मोदकांचा सुगंध दरवळत आहे. तूप-पुरणपोळी आणि ज्याच्या त्याच्या रितीरिवाजानुसार विविध पदार्थांचे बेत आखले जात आहेत.>सरासरी १५ ते २०% दरवाढमिठाई बाजारात गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये सरासरी १५ ते २० टक्के दरवाढ झाली आहे. त्यामध्ये स्टॉबेरी काजू, बटरस्कॉच, चॉकलेट, गुलकंदाच्या मोदकांना सरासरी एका किलोला ८०० ते १ हजार रुपये दर आहे. केशर, मावा मोदक ५०० ते ७०० रुपये आहे. लाडूमध्ये सुपर, महा, नरम बुंदी लाडू किलोला २०० ते ४०० दर आहे. मँगो, अंजीर व मलई बर्फीच्या किमती किलोमागे सरासरी ५०० ते ७०० रुपये अशा आहेत.

टॅग्स :गणेश चतुर्थी २०१८गणेशोत्सव