उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन

By Admin | Updated: August 14, 2014 00:49 IST2014-08-14T00:49:24+5:302014-08-14T00:49:24+5:30

जिल्ह्याच्या निर्मितीनंतर १५ आॅगस्ट या स्वातंत्र्यदिनी जिल्हा मुख्यालयावर ध्वजवंदन कोण करणार याबाबत सुरु असलेल्या चर्चेसह उत्सुकतेला आता पूर्णविराम मिळाला आहे

Flag of the Deputy Chief Minister | उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन

पालघर : जिल्ह्याच्या निर्मितीनंतर १५ आॅगस्ट या स्वातंत्र्यदिनी जिल्हा मुख्यालयावर ध्वजवंदन कोण करणार याबाबत सुरु असलेल्या चर्चेसह उत्सुकतेला आता पूर्णविराम मिळाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते पालघरमध्ये ध्वजवंदन केले जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
नवनिर्मित पालघर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? यासह ध्वजवंदन कोण करणार याबाबत अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात होते. काँग्रेसचे राज्यमंत्री राजेंद्र गावितांसह राष्ट्रवादी वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाडांनी आपली दावेदारी सांगितली होती. जिल्ह्याच्या घोषणेसह १ आॅगस्ट रोजी जिल्हा मुख्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्र्यांची घोषणा करतील असा कयास व्यक्त केला जात होता. परंतु पालकमंत्र्यांची घोषणा न झाल्याने १५ आॅगस्ट रोजी जिल्हा मुख्यालयासमोर पहिले ध्वजवंदन कुणी करावे याबाबत राज्यशासनाकडूनही भूमिका जाहीर केली जात नसल्याने प्रशासनासमोर गंभीर प्रसंग निर्माण झाला होता, परंतु पालकमंत्र्यांची घोषणा झाली नसली तरी पालघरमध्ये १५ आॅगस्ट रोजी होणाऱ्या ध्वजवंदनासाठी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या (१४ आॅगस्ट) संध्याकाळी ४ वा. पालघरमध्ये येवून मुक्काम ठोकणार आहेत.
ते हेलिकॉप्टरने येणार असल्याने पालघरच्या आर्यन हायस्कूलमध्ये हेलिपॅड बनवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे पालघर मुख्यालयासमोर होणारे पहिले ध्वजवंदन आता उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याने या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. (वार्ताहर)

Web Title: Flag of the Deputy Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.