Join us

फिक्स डिपॉझिटला १० हजार कोटींचा फटका, दीड लाख कोटींच्या प्रकल्प खर्चाचे महापालिकेला जड झाले ओझे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 06:27 IST

चालू आर्थिक वर्षात १० हजार कोटी राखीव निधीतून घेण्यात आले आहेत, तर ११ हजार कोटी रुपयांचे अंतर्गत कर्ज काढण्यात आले आहे.

मुंबई : सुमारे दीड लाख कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांच्या खर्चाचे जड झालेले ओझे पेलण्यासाठी मुंबई महापालिकेला मुदत ठेवींचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे एकूण मुदत ठेवींमध्ये दहा हजार कोटी रुपयांची घट झाली आहे. 

रस्ते काँक्रिटीकरण, सुशोभीकरण, कोस्टल रोड, मुलुंड-गोरेगाव लिंक रोड, नवीन पूल बांधणी, सफाई कर्मचारी वसाहत पुनर्विकास, पर्जन्य जलवाहिन्या, शाळांची  दुरुस्ती, अशी विविध कामे पालिकेने हाती घेतली आहेत. त्यासाठी सुमारे दीड लाख कोटी खर्च अपेक्षित आहे. अलीकडच्या काळात पालिकेच्या उत्पन्नात घट झाली आहे.

ही घट भरून काढणे आणि विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देणे, अशी दुहेरी कसरत पालिकेला  करावी लागत आहे. त्यामुळे मुदत ठेवींना हात घालावा लागत आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रकल्पासाठी मुदत ठेवीतील काही भाग राखीव ठेवला जात आहे. साहजिकच ठेवीतील   रक्कम कमी होत आहे. चालू आर्थिक वर्षात १० हजार कोटी राखीव निधीतून घेण्यात आले आहेत, तर ११ हजार कोटी रुपयांचे अंतर्गत कर्ज काढण्यात आले आहे.

अशी झाली घट २०२१-२२ मध्ये ठेवी ९१ हजार कोटींच्या घरात होत्या. त्यानंतरच्या पुढील तीन वर्षांत ठेवींत घट होत असल्याचे दिसते. २०१८ साली ठेवींची रक्कम कमी होती, २०२१-२२ मध्ये त्यात वाढ झाली. त्यानंतर पुन्हा घसरण झाली. विकास कामांसाठी ठेवीमधून पैसे काढले जात असल्याने पालिका प्रशासनावर टीकेची झोड उठत असते. 

मुंबई महापालिकेने मोडलेल्या मुदत ठेवी, चालू मुदत ठेवी, तसेच दोन लाख कोटींच्या दायित्वांबाबत स्पष्टता येण्यासाठी या संदर्भात श्वेतपत्रिका काढावी. यामध्ये ३१ मार्च २०२४ रोजी असणाऱ्या मुदत ठेवी आणि ३१ डिसेंबर २०२४ रोजी असणाऱ्या मुदत ठेवींचा तपशील द्यावा, तसेच मुदत ठेवी मोडण्याची कारणे, मोडलेल्या मुदत ठेवींची संख्या असायला हवी. - रईस शेख, आमदार, समजावादी पक्ष

मुदत ठेवी (कोटींमध्ये)२०१८-१९     ७६,५७९.२९२०२९-२०     ७९,११५.६०२०२०-२१     ७८,७४५.४६२०२१-२२     ९१,६९०.८४२०२२-२३     ८६,४०१. ५३२०२३-२४     ८४,८२४ २०२४ डिसेंबर     ८१,०००

टॅग्स :मुंबई महानगरपालिका