Join us  

मुंबईत आगीचे सत्र सुरूच, डॉकयार्ड रोड येथील गोदामाला आग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2018 1:15 AM

डॉकयार्ड रोड येथील जमेरिया बिल्डिंगमधील एका गोदामाला आग लागल्याचे समजते. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या दाखल झाल्या होत्या. 

मुंबई : डॉकयार्ड रोड येथील जमेरिया बिल्डिंगमधील एका गोदामाला आग लागल्याचे समजते. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या दाखल झाल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, जमेरिया बिल्डिंगमधील गोदामाला रात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास आग लागली. आगीची घटना समजताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या दाखल झाल्या. त्यानंतर अग्निशमन दलाचा जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवून आग विझवली. ही आग कशामुळे लागली याबाबत अद्याप काही समजू शकले नाही. तसेच, या आगीत कोणतीही जीवितहाणी झाली नसल्याचे समजते. मात्र, आगीमुळे बिल्डिंगमधील सात दुकानं जळून खाक झाली आहेत. 

दरम्यान, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अशी अवस्था मुंबई अग्निशमन दलाची झाली आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला सुरू झालेले आगीचे सत्र मुंबईत सुरूच असून, नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात ७ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. यापैकी काही आगींमध्ये केवळ वित्तहानीवर निभवले, तर २ आगींमध्ये ५ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे मुंबईतील अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असताना, २९ डिसेंबर रोजी लोअर परळ येथील कमला मिल कंपाउंडमध्ये मोजो बिस्ट्रो आणि वन अबव्ह रेस्टो बारला लागलेल्या आगीने संपूर्ण मुंबई हळहळली. या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाल्यानंतर, मुंबईत सर्वत्र अग्निसुरक्षेसाठी उपहारगृह, हॉटेल, रेस्टॉरंटची कसून तपासणी सुरू आहे. मात्र, आगीच्या दुर्घटना दररोज कुठे ना कुठे घडत असल्याने, मुंबईकरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.फोर्ट विभागातील सत्र न्यायालयाच्या तिस-या मजल्यावर काल अचानक आग लागली. ही आग सकाळी ७च्या सुमारास लागल्याने मोठी जीवितहानी ठरली. मात्र, नवीन वर्षातील आगीची ही पहिली घटना नव्हे. मरोळ येथील एका इमारतीला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चारजणांचा मृत्यू झाला, तर कांजूरमार्गच्या सिनेव्हिस्टा स्टुडिओमध्ये लागलेल्या आगीत एका आॅडिओ अस्टिटंटचा मृत्यू झाला.

अशा आहेत आगीच्या घटना- १८ डिसेंबर २०१७ - साकीनाका येथील भानू फरसाण कारखान्याला लागलेल्या आगीत १२ मजुरांचा मृत्यू.- २९ डिसेंबर २०१७ - कमला मिल कंपाउंडमधील मोजो ब्रिस्टो आणि वन अबव्ह या रेस्टो बारमध्ये आग लागून १४ जणांचा मृत्यू.- ४ जानेवारी २०१८ - अंधेरी येथील मरोळमधील मैमून मेन्शन या इमारतीला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चारजणांचा मृत्यू.- ४ जानेवारी २०१८ - विलेपार्लेतील प्राइम मॉलमध्ये दुपारच्या वेळेत लागलेली आग लगेचच विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.- ५ जानेवारी २०१८ - मुंबई सेंट्रलमधील जिया अपार्टमेंटमध्ये तळघरात दुपारच्या सुमारास आगीचा भडका उडाला. या आगीत संपूर्ण सामान जळून खाक झाले.- ५ जानेवारी २०१८ - सायनमधील प्रतीक्षानगरमध्ये म्हाडा कॉलनीत आग लागून, एका इमारतीतील ४ घरे पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.- ६ जानेवारी २०१८ - कांजूरमार्गच्या सिनेव्हिस्टा स्टुडिओत ‘बेपनाह’ मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान आग लागली. अग्निशमन दलाने दीडशे लोकांना सुखरूप बाहेर काढले. मात्र, या घटनेत आॅडिओ अस्टिस्टंट गोपी वर्मा याचा मृत्यू झाला.- ६ जानेवारी २०१८ - लोअर परळच्या शिवशक्ती इमारतीत आग लागली. सुदैवाने यात कोणालाही इजा झालेली नाही.- ८ जानेवारी २०१८ - सत्र न्यायालयाच्या तिसºया मजल्यावर सकाळी ७ वाजता आग लागली. त्या वेळेस न्यायालयाच्या परिसरात कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला.

टॅग्स :आगमुंबई