Join us  

सोनई ‘ऑनर किलिंग’मधील पाच जणांना फाशीच; उच्च न्यायालयाचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2019 5:15 AM

नेवासा फाटा येथे १ जानेवारी, २०१३ रोजी तिघांची आंतरजातीय प्रेमप्रकरणातून हत्या करण्यात आली.

मुंबई : संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या जानेवारी, २०१३ मधील अहमदनगरच्या नेवासे तालुक्यातील ‘आॅनर किलिंग’ प्रकरणी सहापैकी पाच आरोपींची फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने सोमवारी कायम ठेवली, एकाची पुराव्याअभावी सुटका केली. सवर्ण जातीच्या मुलीशी प्रेम असल्याने तिघांची हत्या करण्यात आली.आरोपींनी खोट्या प्रतिष्ठेसाठी तिघांची निर्घृणपणे हत्या केली. हे प्रकरण दुर्मीळ आहे, असे म्हणत न्या. भूषण धर्माधिकारी व न्या. संदीप शिंदे यांच्या खंडपीठाने सहापैकी पोपट उर्फ रघुनाथ दरंदले, प्रकाश दरंदले, रमेश दरंदले, गणेश दरंदले आणि संदीप कु-हे या पाच आरोपींना नाशिक सत्र न्यायालयाने ठोठाविलेली फाशीची शिक्षा कायम केली. अशोक नवगिरे यांची पुराव्याअभावी सुटका केली. नाशिक अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांनी ‘आॅनर किलिंग’ प्रकरणी सातपैकी सहा आरोपींना दोषी ठरवत फाशीची शिक्षा ठोठाविली होती. फाशीच्या शिक्षेच्या निर्णयाला आरोपींनी आव्हान दिले होते, तर राज्य सरकारने फाशीची शिक्षा कायम करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका केली होती.नेवासा फाटा येथे १ जानेवारी, २०१३ रोजी तिघांची आंतरजातीय प्रेमप्रकरणातून हत्या करण्यात आली. सचिन सोहनलाल घारू, संदीप थनवार आणि राहुल कंडारे अशी मृतांची नावे आहेत. यापैकी धनवार आणि कुंडारे यांचे मृतदेह कोरड्या विहिरीत पुरले, तर सचिन घारूच्या मृतदेहाचे तुकडे करून ते कूपनलिकेत टाकण्यात आले.एकूण ५३ जणांची साक्षसुरुवातीला नेवासा सत्र न्यायालयात हा खटला सुरू होता. मात्र, साक्षीदारांवर दबाव येऊ नये, यासाठी हा खटला नाशिक सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला. या खटल्यात एकूण ५३ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. पोलिसांनी या सर्व आरोपींवर हत्या, हत्येचे कटकारस्थान रचणे इत्यादी गुन्हे नोंदविले होते.

टॅग्स :मुंबई हायकोर्ट