Join us
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्रक्रियेनंतर पाच रुग्णांना आले अंधत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 06:27 IST

महापालिका रुग्णालयातील हलगर्जीपणामुळे पाच रुग्ण दृष्टिहीन झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

मुंबई : महापालिका रुग्णालयातील हलगर्जीपणामुळे पाच रुग्ण दृष्टिहीन झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून लेन्स बसविल्यानंतर सातपैकी पाच रुग्णांना जंतू संसर्ग झाल्याने त्यांची दृष्टी गेली. या घटनेचे तीव्र पडसाद उमटताच या प्रकरणाची चौकशी करून लेखी अहवाल सादर करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. घटना घडून १५ दिवस झाले,तरी अद्याप कोणावर कारवाई झालेली नाही.ट्रॉमा रुग्णालयात सात रुग्णांवर ४ जानेवारीला शस्त्रक्रिया करण्यात आली. दोन दिवसांनी ६ जानेवारी रोजी त्यांच्या डोळ्यांची तपासणी केली असता, त्यांच्या डोळ्यांत जंतू संसर्ग झाल्याची लक्षणे दिसून आली, तसेच त्यांचे डोळे लालसरही झाले होते. त्यामुळे या सात रुग्णांना तातडीने पालिकेच्या केईएम रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्यातील फातिमाबी शेख, रत्नमा सन्याशी, रफिक खान, गौतम गव्हाणे व संगिता राजभर या रुग्णांची दृष्टी वाचविण्यात डॉक्टरांना यश आले नाही. त्यांचे शस्त्रक्रिया केलेले डोळे निकामी झाले आहेत.पालिकेच्या अक्षम्य हलगर्जीपणाची चौकशी करावी व यासाठी जबाबदार व्यक्तिंवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे अभिजीत सामंत यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली. या प्रकरणाची चौकशी करून लेखी माहिती स्थायी समितीपुढे सादर करण्यात येईल, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी या वेळी दिले.अस्वच्छतेमुळे झाला संसर्ग?रुग्णांना संसर्ग होऊ नये, यासाठी रुग्णालय परिसर, आॅपरेशन थिएटर स्वच्छ ठेवणे आणि ते निर्जंतुकीकरण करणे गरजेचे असते. मात्र, येथे दोन आठवड्यांत एकदाच सफाई करण्यात येते, असा आरोप सामंत यांनी केला. यामुळेच शस्त्रक्रिया झाल्यानंतर लेन्स बसविताना या रुग्णांना जंतू संसर्ग झाला असावा, असे बोलले जात आहे.