पाच नायजेरियन तस्कर पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 06:34 IST2018-10-21T06:34:42+5:302018-10-21T06:34:44+5:30
मुंबईतील डीमेलो रोडवर अंधेरी पोलिसांनी पाच नायजेरियन तस्करांना शनिवारी अटक केली आहे.

पाच नायजेरियन तस्कर पोलिसांच्या जाळ्यात
मुंबई : मुंबईतील डीमेलो रोडवर अंधेरी पोलिसांनी पाच नायजेरियन तस्करांना शनिवारी अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे ४२ ग्रॅम कोकेन, तसेच मेफेड्रॉन आणि एमडीएमएचा साठाही जप्त करण्यात आला आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. हे पदार्थ कुठून आणले जातात आणि कुठे विकले जातात, तसेच या प्रकरणात आणखी कोणी आहेत का, याचाही शोध सुरू आहे.
नायजेरियन तस्करांमुळे पोलिसांची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शुक्रवारी कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला केल्याची घटना सँडहर्स्ट रोड परिसरात घडली. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाचे उपायुक्त शिवदीप लाडे यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार शनिवारी अंधेरीत ५ नायजेरियन तस्कर येणार असल्याची माहिती अंधेरी पोलिसांना मिळाली.
डीमेलो रोडवर साध्या वेशात त्यांनी पाळत ठेवली. जॉन्सन उदे एमे (४४), लेगवु फेलिक्स (४६), एजीके ओलेचिकवू (३५), अर्नेस्ट एजिमे (२८), ची ओनिगवेसा (२८) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन लाख दहा हजारांचे ४२ गॅ्रम कोकेन, वीस हजारांचा एमडी असे २ लाख ५८ हजारांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.