पनवेल परिसरात गृहनिर्माणासाठी पाच हेक्टर जागा
By Admin | Updated: September 25, 2014 00:56 IST2014-09-25T00:56:44+5:302014-09-25T00:56:44+5:30
पनवेल आणि आजूबाजूच्या तालुक्यात सुमारे पाच हेक्टर जमीन मोकळी होणार आहे.

पनवेल परिसरात गृहनिर्माणासाठी पाच हेक्टर जागा
पनवेल : पनवेल आणि आजूबाजूच्या तालुक्यात सुमारे पाच हेक्टर जमीन मोकळी होणार आहे. त्या जागेवर नवीन वर्षात अनेक गृहप्रकल्प उभारण्यात येणार असून त्याकरिता बांधकाम व्यवसायिकांनी फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अगामी काळात या परिसरात मोठ्या प्रमाणात घरे उपलब्ध होतील.
पनवेल परिसरात सिडकोने जागा संपादन करुन या ठिकाणी वसाहती उभारल्या. नवीन पनवेल, कळंबोली, खारघर, कामोठे, तळोजा, उलवे, नावडे , करंजाडे या परिसरात नोड विकसित केले आहेत. मुंबईच्या तुलनेत स्वस्त घरे मिळत असल्याने अनेक मुंबईकर पनवेलकर झाले. शहरीकरण झपाट्याने झाल्याने या भागात भूखंड शिल्लक राहिले नाही त्यामुळे ग्रामीण भागात जागा घेऊन इमारती उभारल्या जात आहेत. असे असले तरी नवी मुंबई विमानतळामुळे पनवेल परिसरात नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोकडे जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार सिडकोने नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्र (नयना)ची स्थापना केली असून अगामी काळात पनवेल, उरण, खालापूर आणि कर्जत परिसरात इमारत उभारायची असेल तर नयनाची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
पनवेल , खालापूर तसेच कर्जतच्या ग्रामीण भागातही नागरिकरणाचे लोण पसरले आहे. त्याचबरोबर या भागात नवनवीन प्रकल्प व उद्योग व्यवसायाबरोबर उपनगरीय रेल्वेमुळे मुंबई अधिक जवळ येत आहे. परंतु आगामी काळात उर्वरीत सिडको प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के भूखंड मिळणार आहेत. त्याचबरोबर ‘नयना’ प्राधिकरणाला १२०० हेक्टर जमीन उपलब्ध होणार आहे. याशिवाय आरसीझेडमध्येही काही भूखंड क्लिअर होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या व्यतिरिक्त पुष्पकनगर आणि जेएनपीटी येथेही प्रकल्पग्रस्तांना भूखंड प्राप्त होतील. यावर बांधकाम व्यवसायिकांचा डोळा असून मोक्याची जागा विकत घेण्यासाठी बिल्डरांना आतापासूनच तयारी सुरु केली आहे. साधारणत: जानेवारीत अनेक भूखंड गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यासाठी प्राप्त होतील, अशी माहिती आहे. (वार्ताहर)