‘जलयुक्त शिवार’साठी पाच कोटी
By Admin | Updated: April 19, 2015 23:24 IST2015-04-19T23:24:36+5:302015-04-19T23:24:36+5:30
‘जलयुक्त शिवार’ अभियान ठाणे जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने चार कोटी १३ लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे.

‘जलयुक्त शिवार’साठी पाच कोटी
ठाणे : ‘जलयुक्त शिवार’ अभियान ठाणे जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने चार कोटी १३ लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. मुंबईच्या सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास संस्थेनेदेखील एक कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. या सुमारे पाच कोटी १३ लाख रुपये खर्चातून जिल्ह्यातील २६ गावपाड्यांच्या रानमाळावर जलयुक्त शिवार अभियान राबविले जाणार आहे.
ग्रामीण भागातील गावपाड्यांच्या शिवारातील जलस्रोत बळकट करून शेतीला मुबलक पाणीपुरवठा करणे शक्य आहे. याशिवाय, पाणीटंचाई दूर होऊन गावकऱ्यांसह जनावरांसाठी उन्हाळ्यात पाणी उपलब्ध होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील २६ गावपाड्यांना ‘जलयुक्त शिवार’ अभियानाद्वारे नवसंजीवनी मिळणार आहे. त्यासाठी निधीची कमतरता पडू नये म्हणून राज्यात प्रथमच ठाणे जिल्हा परिषदेने स्वउत्पन्नातून चार कोटी १३ लाखांची तरतूद केली आहे. त्यात सिद्धिविनायक ट्रस्टची मदत झाल्याने ठाणे जिल्ह्यासाठी पाच कोटी रुपये एवढा निधी उपलब्ध झाला आहे.
२०१९ पर्यंत राज्यातील सर्वांसाठी पाणी आणि टंचाईमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान सुरू केले आहे. यासाठी जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील १३ गावे, मुरबाडमधील आठ, कल्याणमधील दोन, अंबरनाथचे एक तर भिवंडी तालुक्यातील दोन आदी २६ गावपाड्यांच्या शिवारांची राज्य शासनाने निवड केली आहे.