पाच दलालांना अटक

By Admin | Updated: March 5, 2015 00:53 IST2015-03-05T00:53:05+5:302015-03-05T00:53:05+5:30

बनावट कागदपत्र तयार करून पालिकेच्या ताब्यात असलेल्या तब्बल चारशे घरांमध्ये घुसखोरी झाल्याचा प्रकार मानखुर्दमध्ये समोर आला आहे.

Five brokers arrested | पाच दलालांना अटक

पाच दलालांना अटक

समीर कर्णुक - मुंबई
बनावट कागदपत्र तयार करून पालिकेच्या ताब्यात असलेल्या तब्बल चारशे घरांमध्ये घुसखोरी झाल्याचा प्रकार मानखुर्दमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी पालिकेकडून करण्यात आलेल्या तक्रारीवरून ट्रॉम्बे पोलिसांनी महिनाभरात केवळ ५ आरोपींना अटक केली असून, १५ आरोपी फरार आहेत.
प्रकल्पाग्रस्तांसाठी पालिकेची मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरात (पीपीए) राखीव घरे आहेत. शिवशाही पुनर्वसन योजनेअंतर्गत बाधित झोपडीधारकांना येथे घरे देण्यात येतात. गेल्या काही वर्षांमध्ये माफियांनी हस्तांतरणाचे बनावट पेपर तयार करून त्यावर काही पालिकेच्या साहाय्यक आयुक्तांच्या बनावट स्वाक्षऱ्या घेतल्या आहेत. त्यानंतर घरांमध्ये घुसखोरी केली आहे. गेल्या ४ ते ५ वर्षांत पालिकेच्याच ४०० पेक्षा अधिक घरांत घुसखोरी झाली असून, म्हाडा आणि एमएमआरडीएच्या घरांवरदेखील अशाच प्रकारे घुसखोरी झाल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत पालिकेच्या एकूण ३० इमारती आहेत. सर्व इमारती एम पूर्व विभागाच्या ताब्यात आहेत. मात्र येथील इमारत क्रमांक ५, ६, ७, ११, १२ आणि १३ या इमारतींमध्ये गेल्या काही वर्षांत ३२९ जणांनी घुसखोरी करून घरांवर ताबा मिंळवला आहे. ही बाब एम पूर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना समजताच त्यांनी घुसखोरांना १५ दिवसांत घरे खाली करण्याची नोटीस बजावली होती.
एम पूर्व विभागाचे साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी काही महिन्यांपूर्वीच पदभार स्वीकारला आहे. मानखुर्द परिसरातील या घुसखोरीबाबत माहिती मिळताच त्यांनी अधिकाऱ्यांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गेल्या पाच वर्षांत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घुसखोरी झाल्याचे त्यांना समजले. याबाबत त्यांनी तत्काळ युनिट ६ च्या पोलीस उपायुक्तांची भेट घेऊन दलालांच्या टोळीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानुसार ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात अशोक पाटील, उषा पाटील, संजय बाबर, आशा सोनावणे, जय नेलंगे, अर्जुन पवार, विक्की मोरे, आजम शेख, मुनीर खान, अस्लम शेख, सतीश नारकर, संपत काकडे, फतेशरिफ फारुखी, मिलिंद पाठक, रमाकांत जैस्वाल, संतोष पटेल, आण्णा, मिनू आणि माने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एका महिन्यात ट्रॉम्बे पोलिसांनी केवळ अशोक पाटील, संजय बाबर, आशा सोनावणे, संपत काकडे आणि आझम शेख या पाच जणांना अटक केलेली आहे.

च्घरांच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे २० ते २५ लाखांत विकली जाणारी २२५ फुटांची घरे ५ ते ६ लाखांत देण्याचे आमिष माफियांनी दाखवले आहे. यासाठी बनावट अलॉटमेंट लेटर तयार केले आहेत. यावर २००८ किंवा त्यानंतरची तारीख टाकून त्यावर साहाय्यक आयुक्तांची बनावट सही केली जाते.

च्त्यानंतर रात्रीच्या वेळी हे माफिया या इमारतींमध्ये जातात आणि पालिकेने लावलेले टाळे तोडून स्वत:कडील टाळे लावतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही सदनिका ५ ते ६ लाखांत विकून टाकतात.

Web Title: Five brokers arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.