Join us

वादळी वाऱ्यांमुळे राज्यातील मासेमारी ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 19:43 IST

मत्स्य दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मनोहर कुंभेजकरमुंबई : राज्याच्या 720 किमी किनारपट्टीवरील मासेमारी व्यवसाय गेली 4 ते 5 वर्षे डबघाईला आला आहे. मच्छीमारांचे वाढणारे कर्जाचे हप्ते व वेळेवर मिळत नसलेला डिझेल परतावा यामुळे सध्या मच्छीमार मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

यंदा 1 ऑगस्ट रोजी मासेमारीचा नव्या मोसमाला सुरवात झाली. मात्र, या मोसमातील सतत पडणारा पाऊस आणि वादळी वारा यामुळे समुद्रात मासे मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. शासनच्या मत्स्यव्यवसाय खात्याने वेळोवेळी केलेल्या वादळी सूचनांचे पालन करत मासेमारीला गेलेल्या नौका परत बंदरावर परतल्या आहे. एकीकडे नौका बंदरात नांगरून ठेवल्या असून दुसरीकडे खलाशी मच्छिमारांचे पालन पोषण यामुळे उदरनिर्वाह करणे राज्यातील मच्छिमारांना अशक्यप्राय झाले आहे.

ज्याप्रमाणे नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना दुष्काळ जाहीर केला जातो, त्याप्रमाणे मच्छिमारांचा सर्व्हे करून मत्स्य दुष्काळ जाहीर करावा आणि त्यांना आर्थिक मदत करावी, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघाचे अध्यक्ष रामदास संधे यांनी मत्स्यव्यवसाय आयुक्त राजीव जाधव भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.

महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघ हा राज्यातील मच्छिमारांचा शिखर संघ म्हणून कार्यरत असून मच्छिमारांच्या अडीअडचणी सोडवणे हे या संघटनेचे कर्तव्य आहे.

अलिकडेच आलेल्या केयर वादळात मच्छिमारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. आता बुलबुल (महा)वादळामुळे मासेमारीवर सावट आले असून मासेमारीसाठी गेलेल्या बोटी आज माघारी परतल्या आहेत. मासेमारीचा नव्या मोसमाला गेल्या 1 ऑगस्ट पासून सुरवात झाली होती, मात्र गेली 3 महिने पडत असलेला अवकाळी पाऊस, वादळ यामुळे राज्यातील 720 किमी सागरी किनारपट्टीवरील मासेमारी ठप्प झाली आहे, अशी माहिती रामदास संधे यांनी दिली.