मनोहर कुंभेजकर, मुंबई: अवकाळी पावसामुळे वेसावे,मढ,भाटी, मालवणी,मनोरी,गोराई या विविध कोळीवाड्यांतील मच्छिमारांचे मोठे नुकसान झाले. मच्छिमारांनी सुकत ठेवलेले मासे भिजल्याने त्यांचे नुकसान झाले. मच्छिमारांना नुकसानभरपाई मिळण्याची मागणी केली जात आहे.
मच्छिमारांचा शेवटचा हंगाम सुरू झाला आहे. या शेवटच्या हंगामात मिळालेले मासे सुकवून ते पावसाळ्यात विक्री करतात. पावसाळ्यात मासेमारी बंद असल्याने या सुकवलेली मासे विकून त्यावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला जातो. आता शेवटच्या हंगामात मासे मिळण्यास सुरुवात झाली तर अवकाळी पाऊस सुरू झाला. अनेक मच्छिमारांनी मासे सुकविण्यासाठी बाहेर टाकली होती. मासळी सुकण्यासाठी टाकण्यात आलेले मासे पावसामुळे पूर्णपणे भिजून खराब झाल्याची माहिती मरोळ मासळी बाजार मासे विक्रेत्या महिला संघटनेच्या अध्यक्ष राजेश्री भानजी यांनी दिली.
मासेमारी करणाऱ्यांना कृषी दर्जा देण्यात आल्याची घोषणा राज्य सरकारने दि,९ मे रोजी केली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते त्याचप्रकारे मच्छिमारांना देखील शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या कडे केली आहे.
पश्चिम उपनगरात कोळी बांधव मोठ्या प्रमाणात राहत असून त्यांचा मूळ व्यवसाय हा मासेमारी आहे. या विविध कोळीवाड्यांमध्ये सुमारे ८०० ते १००० मासेमारी बोटी आहेत. मासेमारी हंगाम सुरू झाल्यानंतर सुरुवातीचे काही महिने मासे कमी प्रमाणात मिळत होते. मासेमारीसाठी समुद्रात बोट गेल्यानंतर परत येईपर्यंत मोठ्या प्रमाणात खर्च येतो. मासे कमी मिळाल्याने झालेला खर्च देखील मिळत नाही. त्यामुळे मच्छिमारांचे नुकसान होत होते. त्यामुळे कर्ज काढून अनेक मच्छिमार मासेमारी साठी जातात मात्र केलेला खर्च देखील निघत नसल्याने मच्छिमार हवालदिल झाले असल्याची माहिती महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी दिली.
मे महिन्यात अवकाळी पावसामुळे मच्छिमारांना समुद्रात मासे मिळात नाही.आता मासळी हंगामाच्या शेवटी वादळी वारे व वळवाचा पाऊस पडत असल्याने मच्छिमारांवर मोठे संकट आले आहे. या संकटातून सावरण्यासाठी शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.