मच्छिमार बोटीला समुद्रात धडक

By Admin | Updated: January 22, 2015 23:02 IST2015-01-22T23:02:19+5:302015-01-22T23:02:19+5:30

समुद्रातील नवीखाडी परिसरात एका बोटीने येथील मच्छिमार बोटीला १६ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास धडक दिल्याने बोटीचे नुकसान झाले

Fishermen are in the sea | मच्छिमार बोटीला समुद्रात धडक

मच्छिमार बोटीला समुद्रात धडक

भार्इंदर : उत्तन समुद्र किनाऱ्यापासून सुमारे ३५ नॉटीकल मैल खोल समुद्रातील नवीखाडी परिसरात एका बोटीने येथील मच्छिमार बोटीला १६ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास धडक दिल्याने बोटीचे नुकसान झाले असून सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. धडक देणारी बोट ओएनजीसी (आॅईल अ‍ॅन्ड नॅचरल गॅस कार्पोरेशन लिमिटेड) कंपनीशी संबंधित असल्याचा आरोप मच्छिमारांनी केला असून त्याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. या प्रकरणी कोणत्याही शासकीय यंत्रणांनी गुन्हा दाखल केला नसल्याने अपघातग्रस्त मच्छिमार न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.
ऐन मासेमारी हंगामात ओएनजीसी कंपनीमार्फत समुद्रात तेल सर्वेक्षण सुरु करण्याचा प्रयत्न होत आहे. यामुळे उत्पन्नावर विपरीत परिणाम होणार असल्याने मच्छिमारांनी त्याला तीव्र विरोध दर्शविला. त्यामुळे सध्या सर्वेक्षण सुरु केले नसले तरी कंपनीच्या सर्वेक्षण साहित्यांसह बोटी समुद्रात आणण्यात आल्या आहेत. सर्व्हेक्षण लांबल्याने समुद्रात अद्याप मासेमारी सुरु आहे. सर्वेक्षणाची टांगती तलवार डोक्यावर असतानाच उत्तन येथील मच्छिमार डोनाल्ड जोसेफ मालू यांची ताबोर नामक बोट १६ जानेवारी रोजी मासेमारीसाठी गेली असताना पहाटे ४ च्या सुमारास त्यांच्या बोटीला एका वेगवान बोटीने जोरदार धडक दिली. या दुर्घटनेवेळी बोटीत डोनाल्ड यांच्यासह ७ खलाशी उपस्थित होते. ते मासळीसाठी जाळी समुद्रात टाकत असतानाच दुर्घटना घडल्याने शेजारच्या सेनपाल व कोलंबस बोटींतील खलाशी त्वरीत त्यांच्या मदतीसाठी धावून आले. त्यांनी प्रसंगावधान राखून मासळीची जाळी त्वरीत बोटीच्या मागच्या बाजूला खोचल्याने मोठी दुर्घटना टळली. परंतु धडक दिल्याच्या बाजूने बोटीचे मोठे नुकसान झाले आहे़ त्यांनी ही बोट शासकीय अनुदान व कर्जातून बांधली आहे. अपघात घडल्याने त्यांना मासेमारी न करताच रिकाम्या हाताने परतावे लागले असून ऐन मासेमारी हंगामात मासळी उत्पन्नासह बर्फ, डिझेलचा खर्च वाया गेल्याने त्यांचे कुटुंब हवालदिल झाले आहे. अपघातात बोटीचे सुमारे १ लाख रु.चे नुकसान झाले असून याप्रकरणी उत्तन सागरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यास गेलेल्या डोनाल्ड यांना अपघात हद्दीबाहेर घडल्याने गुन्हा दाखल करण्यात तांत्रिक अडसर निर्माण झाल्याचे सांगण्यात आले आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत नुकसान भरपाईसाठी विम्याचा दावा करता येत नसल्याने बोटीची दुरुस्ती रखडल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Fishermen are in the sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.