जेलीफिशमुळे मच्छीमार त्रस्त
By Admin | Updated: September 15, 2014 01:20 IST2014-09-15T01:20:48+5:302014-09-15T01:20:48+5:30
अशा वेळी सहकारी संस्थांसह जिल्हा बँकेकडून घेतलेली कोट्यवधी रुपयांची कर्जे फेडायची तरी कशी, अशा विवंचनेत मच्छीमार सापडले आहेत.

जेलीफिशमुळे मच्छीमार त्रस्त
पालघर : अनेक समस्यांशी सामना करीत नुकतेच समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांना मोठमोठ्या जेलीफिशच्या आक्रमणाचा सामना करावा लागत असून ५० ते ६० नॉटीकल मैलांवरून मच्छीमारांना रिकाम्या हातांनी किना-यावर परतावे लागत आहे. अशा वेळी सहकारी संस्थांसह जिल्हा बँकेकडून घेतलेली कोट्यवधी रुपयांची कर्जे फेडायची तरी कशी, अशा विवंचनेत मच्छीमार सापडले आहेत.
१५ आॅगस्ट रोजी मासेमारी हंगामाला सुरुवात झाल्यानंतर एक ट्रीप मासेमारीची आणल्यानंतर आदिवासी खलाशी कामगार गौरी-गणपतीच्या सुटीवर गेले होते. त्यामुळे संपूर्ण किनारपट्टीवरील मच्छीमारी ठप्प पडली होती. १२ दिवसांच्या सुटीनंतर पुन्हा मच्छीमारीसाठी गेलेल्या नौकांना भरपूर मासे मिळतील, या मच्छीमारांच्या आशेवर समुद्रात निर्माण झालेल्या वादळी वारे व मुसळधार पावसाने पाणी फिरवले. त्यामुळे सर्व नौका रिकाम्या हातांनी किनाऱ्यावर परतल्या होत्या.
१०-११ सप्टेंबर रोजी पुन्हा या नौका मच्छीमारीसाठी समुद्रात गेल्यानंतर मच्छीमारांनी समुद्रात टाकलेल्या जाळ्यांमध्ये मोठमोठे जेलीफिश अडकू लागल्याने मच्छीमारांपुढे नव्याने संकट उभे राहिले होते.
समुद्रात टाकलेली जाळी बोटीत घेताना त्यामध्ये अडकलेले जेलीफिश काढून फेकून देताना या जेलीफिशचे तंतू मच्छीमारांसह कामगारांच्या हातांना स्पर्श करीत असल्याने अंगाला मोठी खाज सुटते. त्यामुळे खलाशी कामगारांना कुठलीही इजा होऊ नये, यासाठी मच्छीमार बांधवांनी समुद्रात टाकलेल्या जाळ्यांना अडकलेल्या जेलीफिशसह सर्व जाळी किनाऱ्यावर आणली होती. यामुळे अनेक मच्छीमारांच्या जाळ्या खराब होऊन मोठे नुकसान झाले होते.