मच्छीमार नेते दामोदर तांडेल यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:09 IST2020-12-05T04:09:49+5:302020-12-05T04:09:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती अध्यक्ष व मच्छीमार नेते दामोदर तांडेल यांचे शुक्रवारी ...

Fisherman leader Damodar Tandel dies | मच्छीमार नेते दामोदर तांडेल यांचे निधन

मच्छीमार नेते दामोदर तांडेल यांचे निधन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती अध्यक्ष व मच्छीमार नेते दामोदर तांडेल यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ७२ वर्षांचे हाेते. त्यांच्या पश्चात पत्नी पूनम, दोन मुले, दोन सुना व दोन नातवंडे असा परिवार आहे.

कोरोनाची लागण झाल्याने त्यांना ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २००२ साली ते महाराष्ट्र मत्स्यउद्योग महामंडळाचे राष्ट्रवादीमधून उपाध्यक्ष झाले होते. मच्छीमारांचे प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आमदार हाेऊन मंत्री होण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले.

आज रात्री त्यांच्यावर चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी त्यांच्या कफपरेड येथील निवासस्थानी पार्थिवाचे मुंबई, ठाणे, पालघर येथील अनेक मच्छीमार कार्यकर्ते व त्यांच्या चाहत्यांनी व राजकीय नेत्यांनी दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.

मु. पो. केळवे, सातपाटी, पालघर हे त्यांचे मूळ गाव होते. मुंबईत कफ परेड मच्छीमारनगर येथे ते राहत होते. हिंदुस्तान लिव्हर कंपनीतून निवृत्त झाल्यावर त्यांनी त्यांचे आयुष्य मच्छीमारांसाठी वाहिले. कंपनीत कामगार युनियनचे अध्यक्ष होते. मच्छीमारांप्रमाणे कामगारांसाठी ते कंपनीत लढत राहिले.

एक धडाडीचा मच्छीमार समाजाचा शासन दरबारी आवाज ऊठविणारा ख्यातनाम कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड गेला. त्यांनी शासनाच्या एलईडी फिशिंग धोरणाविरुद्ध कोर्टात उभारलेल्या लढ्याच्या कार्याच्या स्मृती समाजाच्या चिरकाल स्मरणात राहतील, असा शब्दांत महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो व सरचिटणीस किरण कोळी यांनी समितीच्या तमाम मच्छीमारांतर्फे श्रद्धांजली वाहिली.

दामोदर तांडेल यांच्या निधनामुळे मच्छीमार समाजाचे मोठे नुकसान झाले असून एक झुंजार व लढवय्या नेता काळाच्या पडद्याआड गेल्याने त्यांच्यासारखा लढवय्या नेता होणे कठीण आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई विभागाचे मच्छीमार सेलचे अध्यक्ष प्रदीप टपके यांनी श्रद्धांजली वाहिली

दामोदर तांडेल यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेवर अनेक धडक मोर्चे निघाले. पारंपरिक मासेमारी व्यवसाय नष्ट करणाऱ्या भांडवलदारांच्या पर्ससीन जाळीवर बंदी आणण्यासाठी सातत्याने आवाज उठवला, कोकणातील ३७५ किनारपट्टी गावांतील मच्छीमारांच्या वहिवाटीच्या जमिनी सातबारा उताऱ्यावर आणण्यासाठी, चित्रा-खलिजा तेलवाहू जहाजांच्या टकरीमुळे मासेमार महिला विक्रेत्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून १५ हजार कोळी महिला विक्रेत्यांना प्रत्येकी १० हजार मिळायलाच हवे व छोट्या मच्छीमारांना ८ कोटी रुपये नुकसानभरपाई मिळावी, मुंबईतील कोळीवाडे व मच्छीमार वसाहतींना ३ चटई क्षेत्र व ३३ फुटांच्या आर.सी.सी.च्या बांधकामांना परवानगी मिळण्यासाठी अथक पाठपुरावा केला होता, अशी माहिती ‌‘आजचा तटरक्षक’चे संपादक प्रवीण दवणे यांनी दिली.

---------------------------------------------

Web Title: Fisherman leader Damodar Tandel dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.