रोह्यात मासळी विक्रेत्यांचा वाद

By Admin | Updated: August 11, 2014 23:24 IST2014-08-11T23:24:28+5:302014-08-11T23:24:28+5:30

रोहे शहरात गेल्या चाळीस वर्षांपासून मासळी विक्री करणाऱ्या बोर्ली येथील कोळी महिलांना आता स्थानिकांनी व्यवसाय करण्यास विरोध केला आहे.

Fisheries dispute in Rohé | रोह्यात मासळी विक्रेत्यांचा वाद

रोह्यात मासळी विक्रेत्यांचा वाद

पनवेल : रोहे शहरात गेल्या चाळीस वर्षांपासून मासळी विक्री करणाऱ्या बोर्ली येथील कोळी महिलांना आता स्थानिकांनी व्यवसाय करण्यास विरोध केला आहे. त्या बाहेरच्या असून आमचा व्यवसाय होत नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हा वाद विकोपाला गेला असून या संदर्भात बाहेरील महिलांनी शासकीय यंत्रणेकडे दाद मागितली आहे.
तालुक्याचे ठिकाण असलेले रोहा हे शहर असून या ठिकाणी नगरपालिका आहे. शहरात आजमितीला मोठी बाजारपेठ आहेच. त्याचबरोबर फेरीवाल्यांची संख्याही अधिक आहे. या व्यतिरिक्त शहरात मासळी मार्केटही असून या ठिकाणी वेगवेगळया प्रकारची मासळी विक्रीसाठी ठेवण्यात येते. गेल्या चाळीस वर्षांपासून स्थानिक कोळी भगिनीबरोबर बोर्ली येथील आठ जणी रोहा मार्केटमध्ये मासे विक्री करतात . इतक्या वर्षापासून एकत्र व्यवसाय करीत असताना त्यांच्यामध्ये फारशे वाद झाले नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून बोर्ली येथील महिलांना स्थानिक कोळी विक्रेत्यांनी वेगळे टाकले आहे. आम्ही स्थानिक असून तुम्ही बाहेरचे आहात त्यामुळे येथे धंदा करण्याचा आमचा अधिकार असल्याचे सांगून त्या आठ महिलांना बसून दिले जात नाही.
ग्राहक या आठ महिलांकडूनच मासे खरेदी करीत असल्याने आमचा व्यवसाय होत नसल्याचे स्थानिक विक्रेत्यांचे म्हणणे आहे. दरम्यान आम्ही बोर्ली येथून ताजी मासळी विकण्यासाठी आणतो आम्ही कोणत्याही ग्राहकांना हाताला धरून माल त्यांच्या माथी मारीत नाही.आज बाहेरच्या राज्यातून लोक येऊन आपल्याकडे व्यवसाय करतात. त्यांना फारशा कोणीच विरोध करीत नाहीत याचे कारण म्हणजे सर्वांना कुठेही जावून व्यवसाय किंवा राहण्याची मुभा आहे. हे आमचे गाव आहे येथे आम्हीच मासे विकणार ही भूमिका कायद्यात बसते का असा सवाल शैला भालचंद्र भोईर या ६० वर्षीय महिला विक्रेत्याने केला आहे.
गेली चाळीस वर्षे या ठिकाणी व्यवसाय करतो म्हणजे आमचीही ही कर्मभूमीच आहे. आणि रायगडची भूमी म्हणून आपण सर्वजण अभिमानाने सांगतो मात्र रायगडकर रायगडवासीयांना विरोध करतात ही शोकांतिका असल्याचे सुगंधा मनोहर पोसणे यांनी प्रतिक्रिया दिली. या संदर्भात त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, जिल्हाधिकारी सुमंत भांगे, पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांना साकडे घातले होते.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तटकरे यांनी बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मात्र आजतागायत पर्यायी मार्ग निघालेला निघालेला नाही. त्या महिलांचे कुटुंब तर त्यावरच अवलंबून असून त्यांच्यासमोर आर्थिक प्रश्न उभा राहिला आहे. या संदर्भात रोहा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अवधुत तटकरे यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत मी आज काहीच बोलू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Fisheries dispute in Rohé

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.