Join us

'राजसाहेब, त्या बेकायदा मासेविक्रेत्यांना हटवा', कोळी महिलांनी घेतली राज ठाकरेंची भेट

By ravalnath.patil | Updated: October 5, 2020 18:02 IST

Raj Thackeray : कोरोना संकट काळात राज ठाकरे यांची विविध क्षेत्रातील संघटनेच्या लोकांनी भेट घेतली आहे.

ठळक मुद्देमनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

मुंबई : मुंबईतील कोळी महिलांनी सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी कोळी महिलांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, कोरोना संकट काळात राज ठाकरे यांची विविध क्षेत्रातील संघटनेच्या लोकांनी भेट घेतली आहे.

मुंबईतील डोंगरी मासळी बाजाराबाहेर परप्रांतीय मासेविक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याप्रकरणी कोळी महिलांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी या महिलांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गर्दी केली. यावेळी राज ठाकरे हे स्वत: या महिलांच्या भेटीसाठी आले व त्यांच्याशी संवाद साधला. 

परप्रांतीय मासेविक्रेत्यांच्या मुजोरीमुळे आमच्या व्यवसायाला मोठा फटका बसतो आहे, असे गाऱ्हाणे या महिलांनी मांडले. त्या बेकायदा मासेविक्रेत्यांना हटवा, अशी मागणी त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे केली. राज ठाकरे यांनी कोळी भगिनींची तक्रार ऐकून घेतली आणि हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, मनसेकडे सत्ता नसतानाही कोरोना संकट काळात आपले विविध प्रश्न घेऊन आतापर्यंत अनेक संघटनेच्या लोकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. यामध्ये जिम चालक-मालक, थिअटर चालक-मालक, सलून व्यावसायिक, हॉटेल मालक-चालक, मुंबईतील डबेवाले अशा विविध क्षेत्रातील लोकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. 

या भेटीत लॉकडाऊनमुळे येणाऱ्या अडचणी राज ठाकरे यांच्यापुढे मांडल्या होत्या. तसेच, याबाबत आवाज उठवण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करण्याचे व प्रसंगी आंदोलन करण्याचे आश्वासन राज ठाकरे यांनी दिले होते.

टॅग्स :राज ठाकरेमुंबईमनसे