सिडकोविरोधात प्रथमच एकीचे बळ
By Admin | Updated: May 29, 2015 00:29 IST2015-05-29T00:29:33+5:302015-05-29T00:29:33+5:30
गाव - गावठाणात उभारण्यात आलेल्या अतिक्रमणांवर सिडकोने धडक कारवाई सुरू केली आहे. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या कारवाईचा प्रकल्पग्रस्तांनी धसका घेतला आहे.

सिडकोविरोधात प्रथमच एकीचे बळ
नवी मुंबई : गाव - गावठाणात उभारण्यात आलेल्या अतिक्रमणांवर सिडकोने धडक कारवाई सुरू केली आहे. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या कारवाईचा प्रकल्पग्रस्तांनी धसका घेतला आहे. कारवाईच्या विरोधात प्रकल्पग्रस्तांनी केलेल्या हिंसक आंदोलनाला न जुमानता सिडकोने कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी उभारलेल्या बांधकामांच्या संरक्षणासाठी प्रथमच शहरातील सर्वपक्षीय नेते एकत्रित उभे ठाकले आहेत. यासंदर्भात गुरुवारी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या नेत्यांनी सिडकोच्या कारवाईविरोधात एल्गार पुकारला.
आमदार मंदा म्हात्रे यांच्या पुढाकाराने या संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला ऐरोलीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप नाईक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ भगत, माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले, भाजपाचे युवा नेते वैभव नाईक, प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष मनोहर पाटील, कार्याध्यक्ष राजेश पाटील, सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत आदी उपस्थित होते.
गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याचे आदेश असतानाही अंमलबजावणी का होत नाही. सिडकोच्या चुकीच्या धोरणांमुळे येथील गावठाणांचा विस्तार रखडल्याने प्रकल्पग्रस्तांनी आपल्या वाढत्या कुटुंबांच्या गरजा लक्षात घेवून वाढीव बांधकामे केली आहेत. ती नियमित करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. मात्र अंमलबजावणी होत नाही. उलट कारवाई करून त्यांना रस्त्यावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रकल्पग्रस्तांवरील हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. (प्रतिनिधी)
प्रकल्पग्रस्तांवरील अन्याय कदापि खपवून घेतला जाणार नाही. सत्ताधारी असताना देखील आम्ही सरकारच्या चुकीच्या धोरणाचा विरोध केला होता. प्रकल्पग्रस्तांवरील हा अन्याय थांबला पाहिजे. सिडकोने ही कारवाई त्वरित थांबवावी यासाठी आम्ही राज्याचे विरोधी पक्षनेते विखे पाटील यांची भेट घेतली आहे.
- संदीप नाईक, आमदार
नवी मुंबईत शेतकऱ्यांची १०० टक्के जमीन सिडकोने घेतली. त्यांना कोणत्याही प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या नाहीत. प्रकल्पग्रस्तांनी घरे बांधली त्यापैकी काही रूम पोटाची खळगी भरण्यासाठी भाड्याने दिल्या. त्यावर सिडको हातोडा चालवत असेल तर शेतकऱ्यांनी आत्महत्या करावी काय?
- नामदेव भगत,
नगरसेवक शिवसेना
सर्वपक्षीय नेत्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर यापूर्वीच एकत्र यायला हवे होते. मात्र प्रत्येक जण आपलाच स्वार्थ पाहत होता. म्हणूनच ही वेळ आली. शिवसेनेने या विरोधात सर्वप्रथम आवाज उठवला होता.
- विजय चौगुले, विरोधी पक्षनेते, महानगरपालिका
जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न १०० टक्के सुटणार नाहीत तोपर्यंत आम्ही सर्वपक्षीय नेते मतभेद विसरून कृती समितीच्या माध्यमातून एकत्र लढणार आहोत. आम्ही सर्व जण एकत्र आलो आहोत म्हणूनच प्रकल्पग्रस्तांचे अच्छे दिन येतील.
- दशरथ भगत,
जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
च्सिडकोने ही कारवाई त्वरित थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
च्सिडको-एमआयडीसी प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीच्या झेंड्याखाली एकत्रित येऊन सिडकोच्या कारवाईचा विरोध करण्याची भूमिका यावेळी घेण्यात आली.
प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी रायगडमधील सर्वपक्षीय नेते नेहमीच एकत्रत येतात. अगदी त्याच धर्तीवर आज आम्ही सर्व एकत्रित आलो आहोत. सिडकोने गावठाण विस्ताराचा सर्व्हे करावा व २०० मीटरची हद्द निश्चित करावी. तत्पूर्वी प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे ऐकू न घेण्यासाठी प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांची एक संयुक्त बैठक लावावी.
- मंदा म्हात्रे, आमदार