स्वातंत्र्यानंतर प्रथमच सात पाड्यांतील अंधार झाला दूर
By Admin | Updated: June 3, 2015 23:09 IST2015-06-03T23:09:12+5:302015-06-03T23:09:12+5:30
तालुक्यातील दखनेपाडा, उंबरपाडा, वडपाडा, हैदोली, नवापाडा, मनमोहाडी व भाटी पाडा या आदिवासी अतिदुर्गम पाड्यातील अंधात आता दूर झाला

स्वातंत्र्यानंतर प्रथमच सात पाड्यांतील अंधार झाला दूर
जव्हार : तालुक्यातील दखनेपाडा, उंबरपाडा, वडपाडा, हैदोली, नवापाडा, मनमोहाडी व भाटी पाडा या आदिवासी अतिदुर्गम पाड्यातील अंधात आता दूर झाला आहे. प्रगती प्रतिष्ठान, जव्हार ग्राम ऊर्जा सोल्युशन प्रा. लि. पुणे तसेच आय.सी.आय.सी.आय बँकेच्या संयुक्त विद्यामाने सौर ग्राम ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. त्यामुळे या पाड्यातील दोनशे घरात आता लख्ख उजेत पडणार आहेत.
शासनाचे दुर्लक्ष व लोकप्रतिनिधींची अनास्था यामुळे या पाड्यात आजही विकासकामे पोहचली नाही. वीज नसल्याने अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागत होते. जव्हार येथील प्रगती प्रतिष्ठानच्या सचिव सुनंदा पटवर्धन यांना ही बाब सतत बोचत होती.
या सात पाड्यांना मुलभूत सुविधा प्राप्त करून देण्यासाठी शासन तसेच लोकप्रतिनिधींच्या भरोवशावर न राहता दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्थाच्या मदतीने वीज उपलब्धतेसाठी गेल्या एक वर्षापासून प्रयत्न सुरू केले. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. प्रकल्पासाठी लागणारा एक कोटी ३९ लाख रूपयांचा खर्च बँकेने उचलला. तांत्रिक बाबी पूर्ण करणे, प्रकल्पाची उभारणी, वीज फिटींग करण्यासाठी ग्रामऊर्जा सोल्युशन प्रा. लि. पुणे यांनी सहकार्य केल्याने प्रत्येक पाड्यात सौरऊर्जेचे मोठे युनिट (स्टेशन) आज उभे आहे. या सातही केंद्राद्वारे एकुण ३८ किलोवॅट वीज निर्मिती सुरु झाली आहे. प्रत्येक घरासाठी स्वतंत्र वीज मिटर लावण्यात आले असून घरटी शंभर रुपये नाममात्र भाडे आकारण्यात येणार असल्याची माहिती सुनंदाताईंनी दिली. या प्रकल्पाच्या वीज निर्मितीची क्षमता जास्त असल्यामुळे ग्रामस्थांना विजेवर चालणारे इतर व्यवसायही करता येणार आहे. या युनिटचे लोकार्पण खासदार विष्णू सवरा यांच्या हस्ते करण्यात आले.
(वार्ताहर)