Join us

संपूर्ण भारतीय बनावटीच्या विमानाची पहिली चाचणी यशस्वी; यादव यांच्या प्रयत्नांना यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 05:21 IST

लॅण्डिंग, टर्न, स्पीड ऑफ अशा चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याचे जाहीर केले असले तरी आणखी दोन चाचण्या शिल्लक आहेत. त्या झाल्या की विमान सेवेत रुजू होऊ शकेल.

मुंबई : कॅप्टन अमोल यादव यांनी ७४ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पहिल्यावहिल्या भारतीय बनावटीच्या विमानाच्या टेक आॅफ, लॅण्डिंग, टर्न, स्पीड ऑफ अशा चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याचे जाहीर केले असले तरी आणखी दोन चाचण्या शिल्लक आहेत. त्या झाल्या की विमान सेवेत रुजू होऊ शकेल.या चाचण्यांसाठी प्रचंड आर्थिक चणचण भासत आहे. अद्याप शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नसून आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी शासनाचे सहकार्यही अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. २००९ रोजी सुरू झालेला भारतीय बनावटीच्या या विमानाचा प्रवास अजूनही सुरूच आहे. २०१९ मध्ये चार वर्षांच्या कागदोपत्री टोलवाटोलवीनंतर कॅप्टन अमोल यादव यांच्या विमानाची अधिकृत नोंदणी झाली. त्यानंतर पुन्हा त्याच्या चाचण्या पूर्ण करण्यासाठी त्यांना २०२० ची वाट पाहावी लागली. यापुढील चाचणी विमान सर्किट पूर्ण करण्याची आणि एका विमानतळाहून दुसऱ्या विमानतळावर जाण्याची असेल.मागील सरकारकडून आलेल्या कटू अनुभवानंतर अद्याप राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारशी त्यांचा संपर्क न झाल्याची माहिती यादव यांनी दिली. नव्या राज्य सरकारकडून त्यांच्या या आत्मनिर्भर प्रयत्नासाठी आर्थिक मदतीची अपेक्षा आहे.आपल्याला आपल्या देशासाठी काही तरी करून दाखवायचे आहे, हा विचार तरुण पिढी, उद्योजकांनी मनात पक्का करावा, असे आवाहन कॅप्टन अमोल यांनी स्वातंत्र्य दिनी केले.