पहिला संस्कृत अॅनिमेशनपट
By Admin | Updated: July 3, 2015 03:46 IST2015-07-03T03:46:15+5:302015-07-03T03:46:15+5:30
बहुतांश भारतीयांचा संस्कृत भाषेशी संबंध हा शाळेपर्यंत मर्यादित असतो. या भाषेत विपुल साहित्यनिर्मिती झालेली असली तरी मनोरंजन क्षेत्र संस्कृतपासून चार हात लांबच आहे.

पहिला संस्कृत अॅनिमेशनपट
स्नेहा मोरे,मुंबई
बहुतांश भारतीयांचा संस्कृत भाषेशी संबंध हा शाळेपर्यंत मर्यादित असतो. या भाषेत विपुल साहित्यनिर्मिती झालेली असली तरी मनोरंजन क्षेत्र संस्कृतपासून चार हात लांबच आहे. इन्फोसिसचे कर्मचारी रवी शंकर
यांचा एका दहा दिवसीय कार्यशाळेच्या निमित्ताने संस्कृतशी संबंध आला आणि त्यांनी या भाषेत अॅनिमेशनपट तयार करण्याचा निर्णय घेतला. ‘पुण्यकोटी’ असे या अॅनिमेशनपटाचे नाव असून, जगभरातील ३० अॅनिमेटर या अॅनिमेशनपटासाठी काम करीत
आहेत.
‘पुण्यकोटी’ ही कर्नाटकमध्ये लोकप्रिय असलेली लोककथा आहे. पुण्यकोटी ही नेहमी खरे बोलणारी गाय कशा प्रकारे जीवनाचे धडे देते यावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाची संहिता त्यांनी संकेतस्थळावर अपलोड केली आणि जगभरातील अॅनिमेटर्सना या प्रकल्पात सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ३० अॅनिमेटर्स या प्रकल्पात सहभागी झाले आहेत. १०० मिनिटांच्या या अॅनिमेशनपटात १२ पात्रांचा समावेश आहे. सध्या या चित्रपट सुमारे ६० टक्के पूर्ण झाला असून, आॅगस्ट २०१६मध्ये हा अॅनिमेशनपट आॅनलाइन प्रदर्शित करण्यात येणार आहे.
हा देशातील पहिला संस्कृत थ्रीडी अॅनिमेशनपट असणार आहे. या संस्कृत अॅनिमेशनपटाचे दिग्दर्शन आणि संहितालेखन रविशंकर व्ही. यांनी केले आहे. संगीताची धुरा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे प्रख्यात संगीतकार इलया राजा यांनी सांभाळली आहे.
‘पुण्यकोटी’च्या कोअर टीमध्ये संगीतकार इलया राजा, क्रिएटिव्ह डायरेक्टर गिरीश ए.व्ही., संवाद लेखक अन्वर अली, एडिटर मनोज कन्नोथ, ले-आऊट बैजू पी.एस., कॅरेक्टर डिझाइन राकेश नायर आणि प्रोडक्शन मॅनेजर सिंधू एस.के. यांचा समावेश आहे. शिवाय, जगभरातील संस्कृततज्ज्ञ या प्रकल्पात सहभागी झाले आहेत. या अॅनिमेशनपटाच्या निर्मितीसाठी साधारण ५ कोटींचा खर्च येणार असून, क्राउड फंडिंगच्या माध्यमातून हा निधी उभा करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे.
अख्खा अॅनिमेशनपट आॅनलाइन!
या अॅनिमेशनपटाचे संपूर्ण काम हे आॅनलाइन सुरू आहे. ३० अॅनिमेटर्सला घेऊन तीन-तीन मिनिटांचे दृश्य बनवले जात आहे. या अॅनिमेशनपटातील पात्र रेखाटणे, त्यातील जिवंतपणा, दृश्यांची आखणी, डिझायनिंग ही सर्व कामे आॅनलाइन पद्धतीने विविध देशांमध्ये सुरू आहेत. शिवाय, डबिंग, इफेक्ट्स, डमी व्हॉइस, साउंड डिझायनिंग, लाइटिंग आणि एडिट-करेक्शन या सगळ्या तांत्रिक बाजूदेखील विविध देशांमधून आॅनलाइन पद्धतीने हाताळल्या जात आहेत.
या चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी कुणीही तयार होत नव्हते. त्यामुळे हा प्रोजेक्ट मी स्वतंत्ररीत्या करायचे ठरविले. हल्ली लहान मुलांना स्पॅनिश आणि जॅपनीज् भाषेतील कार्टून्स भावतात. त्यामुळे त्यांच्यासमोर संस्कृत भाषेतील अॅनिमेशनपट आणला, तर ते स्वीकारतील असा विश्वास आहे.
- रविशंकर व्ही. (दिग्दर्शक)