Join us  

अकरावीच्या पहिल्या फेरीत राज्यात 88 हजार विद्यार्थ्यांची प्रवेशाकडे पाठ; दुसऱ्या गुणवत्ता यादीकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2021 1:14 PM

पहिल्या फेरीत १ लाख २१ हजार विद्यार्थ्यांनी घेतले प्रवेश

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्र, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर या पाच महानगर क्षेत्रांत अकरावी प्रवेश केंद्रीय ऑनलाइन प्रवेश पद्धतीने सुरू आहेत. या प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीनंतर कॅप प्रक्रियेतून अलॉटमेंट मिळालेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ५६ टक्के विद्यार्थ्यांनी म्हणजेच १ लाख ५ हजार विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेश निश्चित केले आहेत, तर ४४ टक्के विद्यार्थ्यांनी म्हणजेच ८८ हजार विद्यार्थ्यांनी यादीत नाव येऊनही प्रवेश घेतले नसल्याची माहिती पुढे आली आहे. 

यादीत नाव येऊनही प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे सर्वाधिक प्रमाण मुंबई विभागात असून, त्यानंतर पुणे, नागपूर, नाशिक व अमरावती विभागांत आहे. पहिल्या फेरीच्या यादीत नाव येऊनही संबंधित महाविद्यालयात जाऊन रिपोर्ट न केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या राज्यात ७० हजार ३०८ इतकी आहे. ३१३ विद्यार्थ्यांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. ३८९ जणांचे अर्ज नाकारण्यात आले आहेत. पहिल्या फेरीत अलॉटमेंट मिळालेल्या प्रवेशाच्या निश्चितीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना मुभा देण्यात आली होती. पुढील फेरीसाठी पसंतीक्रम भरण्याची संधीही देण्यात आली आहे. ४ सप्टेंबर रोजी अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. 

पहिल्या फेरीसाठी या पाचही महानगरपालिका क्षेत्रात कॅप प्रवेशासाठी ३ लाख ६० हजार ५६३ जागा उपलब्ध होत्या. त्यातील एकूण १ लाख ८८ हजार ३४२ जागा अलॉट करून देण्यात आल्या होत्या. यापैकी १ लाख ५ हजार ६०२ विद्यार्थ्यांनी कॅप प्रक्रियेतून आपले प्रवेश निश्चित केले आहेत. या प्रक्रियेदरम्यान १६ हजार २१७ प्रवेश हे कोट्यातून झाले आहेत. पहिल्या फेरीनंतर अकरावीच्या कॅप आणि कोटा दोन्ही मिळून एकूण प्रवेशाची संख्या १ लाख २१ हजार २८० झाली आहे. 

अकरावी पहिल्या फेरीतील प्रवेश विभाग    प्रवेशित    कोटा    एकूण     विद्यार्थी     प्रवेश अमरावती    ३७५९    २४७    ४००६मुंबई    ५८०५६    ११६७४    ७०१८०नागपूर    १०६९९    १०९७    ११७९६नाशिक     ७९६४    ३४६    ८३१०पुणे    २४६७५    २८५३    २७५२८एकूण    १०५६०३    १६२१७    १२१८२०

टॅग्स :विद्यार्थी