पहिला पेपर सुरळीत !
By Admin | Updated: February 22, 2015 02:10 IST2015-02-22T02:10:05+5:302015-02-22T02:10:05+5:30
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी बारावी परीक्षा शनिवारपासून सुरळीत सुरू झाली. पहिल्या दिवशी राज्यात ४0 कॉपीची प्रकरणे उघडकीस आली.

पहिला पेपर सुरळीत !
मुंबई : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी बारावी परीक्षा शनिवारपासून सुरळीत सुरू झाली. पहिल्या दिवशी राज्यात ४0 कॉपीची प्रकरणे उघडकीस आली. यापैकी १४ प्रकरणे समोर आल्याने पुणे मंडळ आघाडीवर राहिले.
मुंबई मंडळातील १९५ परीक्षा केंद्रावर सकाळी बारावीचा पहिला पेपर सुरळीत पार पडला. भाषा विषयाचा पेपर असल्याने शनिवारी परीक्षा केंद्रावर अधिक विद्यार्थ्यांची गर्दी नव्हती. नियोजित वेळी परीक्षा सुरू झाली. परीक्षेचा विद्यार्थ्यांना १0 मिनिटेअगोदर प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय मंडळाने यंदा घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका देण्यात आली. भाषा विषय असल्याने कॉपीचे प्रमाण सर्वत्र कमी आढून आल्याने. पहिल्याच दिवशी कॉपी प्रकरणांमध्ये पुणे मंडळ आघाडीवर राहिले. पुणे मंडळात १४ कॉपीची प्रकरणे उघडकीस आली; तर मुंबई, औरंगाबाद, लातूर आणि कोकण या मंडळांमध्ये कॉपीचे एकही प्रकरण समोर आले नाही.
शिरोडकर शाळेत लग्नसमारंभ
परळ येथील शिरोडकर शाळा प्रशासनाने शाळेतील सभागृह लग्नकार्यासाठी दिल्याने पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. परीक्षेच्या कालावधीत कोणत्याही समारंभासाठी शाळेचे सभागृह देऊ नये, असे आदेश असतानाही याकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले. समारंभाचा विद्यार्थ्यांच्या परीक्षेत अडथळा निर्माण झाल्याने अखेर पालकांनी शाळा प्रशासनाला धारेवर धरले. त्यामुळे पालक आणि व्यवस्थापनामध्ये शाब्दिक चकमक उडाली. याप्रकरणी शाळेकडे विचारणा केली जाईल, असे मुंबई मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पांडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कॅलक्युलेटरच्या वापरास परवानगी
बारावी परीक्षेला बसलेल्या आॅटिस्टिक (स्वमग्न) विद्यार्थ्यांना गणित विषयाबरोबरच विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र आणि वाणिज्य शाखेतील बुक कीपिंग व अकाउंटन्सी या विषयांकरिता साधा (बेसिक) कॅलक्युलेटर वापरण्याची परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांबरोबरच अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही ही सुविधा मिळणार आहे. ही सवलत अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र आणि वाणिज्य शाखेतील बुक कीपिंग व अकाउंटन्सी या विषयांसाठीच लागू केला आहे.