The first 'Oxygen Express' to run through Kalamboli | कळंबोलीतून धावली पहिली ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’

कळंबोलीतून धावली पहिली ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’

लोकमत न्यूज नेटवर्क

कळंबोली : काेरोना रुग्णसंख्या वाढत असून, उपचारासाठी ऑक्सिजनची मागणीही वाढत आहे. त्यामुळे राज्याला विशाखापट्टणम येथून ऑक्सिजन वाहून आणण्यासाठी सात मोठे टँकर घेऊन जाणारी देशातील पहिली ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ सोमवारी रवाना करण्यात आली. कळंबोली रेल्वे मालधक्का येथून रात्री ८ वाजता विशाखापट्टणमच्या दिशेने १६ टन क्षमतेचे सात रिकामे टॅंकर रवाना झाले आहेत. या ऑक्सिजन एक्स्प्रेसला परिवहनमंत्री अनिल परब यांनी हिरवा कंदील दाखवला. विशेष ऑक्सिजन रेल्वे वेगवान चालवण्यासाठी ग्रीन कॉरिडॉरची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे तीन दिवसात ११२ मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजन मिळेल. हा प्रयोग यशस्वी झाल्यास ऑक्सिजन पुरवठा कमी पडणार नसल्याचे मत परिवहनमंत्री अनिल परब यांनी व्यक्त केले आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. इतर राज्यातून ऑक्सिजन आणण्यासाठीच्या वाहतुकीस बराच कालावधी लागणार असल्याने रेल्वे प्रशासनाच्या मदतीने रेल्वेने ऑक्सिजन आणता येईल का याचा विचार करत हा प्रयोग करण्यात आल्याचे अनिल परब यांनी सांगितले. महाराष्ट्रातील ऑक्सिजन कमतरता भरून काढण्यासाठी भारतीय रेल्वेकडून लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) एक्स्प्रेस चालवण्याची तयारी दर्शवली.

त्यानुसार दुसऱ्या राज्यातून ऑक्सिजन आणण्यासाठी कळंबोली येथील रेल्वे मालधक्क्यावर विशेष ट्रक बनविण्यात आला. त्याचबरोबर टॅंकर बोगीवर चढ-उतार करण्यासाठी रॅम्प बनवला आहे. त्यानुसार पुणे, नवी मुंबई, मुरबाड याठिकाणाहून ३३२० मीटर उंचीपेक्षा कमी असलेले तसेच १६ टन क्षमता असणाऱ्या टॅंकरची व्यवस्था पनवेल परिवहन विभागाकडून करण्यात आली. विजाग, जमशेदपूर, राउरकेला, बोकारो येथून ऑक्सिजन आणण्यासाठी सोमवारी रात्री ८ च्या सुमारास सात टॅंकर असलेले ऑक्सिजन एक्स्प्रेस रेल्वे विशाखापट्टणमच्या दिशेने रवाना झाली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर लगेच दुसऱ्या फेरीची तयारी करण्यात येणार असल्याचे परिवहन अधिकारी शशिकांत तिरसे यांनी सांगितले.

उंचीमुळे ७ टॅंकर रेल्वे प्रशासनाकडून रिजेक्ट

३३२० मीटर उंचीपेक्षा कमी असणारेच टॅंकर रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आले आहेत. त्यापेक्षा मोठे टॅंकर रिजेक्ट करण्यात आले आहे. दिवसभरात सात टॅंकर रिजेक्ट करण्यात आल्याने १० टॅंकर पाठविण्याऐवजी सात टॅंकर पाठवण्यात आले आहेत.

ऑक्सिजन टॅंकरसाठी विशेष बोगीची रचना

ऑक्सिजन टॅंकरसाठी रेल्वे प्रशासनाकडून त्यांच्या उंचीबाबत दक्षता घेत बोगीचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी १८ मीटर बोगीची रचना आहे. बोगीच्या मधोमध टँकर क्लिपच्या साहाय्याने फिटिंग करण्यात आले आहे. जेणेकरून टॅंकर सरकणार नाहीत, याची परिपूर्ण दक्षता घेण्यात आली आहे. दोन्ही टॅंकरमध्ये तीस फुटाचे अंतर ठेवण्यात आले असून, पुढे आणि पाठीमागे असे अनुक्रमे दोन बोगी रिकाम्याच ठेवण्यात आल्या आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The first 'Oxygen Express' to run through Kalamboli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.