Join us

लग्नाच्या पहिल्या रात्रीच सौदा करून पती पसार; कुंटणखान्यातून सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 01:48 IST

लग्नाच्या पहिल्याच दिवशी तो तिला मुंबईतील कामाठीपुरा येथील शांती बद्री थापा या महिलेच्या कुंटणखान्यात घेऊन आला.

मुंबई : प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याने तिला पश्चिम बंगालमधून पळवून आणले. त्यांनी लग्न केले. ती सुखी संसाराची स्वप्ने पाहात असतानाच, लग्नाच्या पहिल्या रात्रीच मुंबईत पत्नीचा वेश्याव्यवसायासाठी सौदा करून तो पसार झाल्याची घटना रविवारी नागपाडा येथे उघडकीस आली. तब्बल दीड महिन्यानंतर वेश्यावस्तीतून या तरुणीची नागपाडा पोलिसांनी सुटका केली.पश्चिम बंगाल येथील रहिवासी असलेली १९ वर्षीय रेश्मा (नावात बदल) उच्चशिक्षित आहे. आरोपी तरुणाने तिच्याशी ओळख वाढविली. त्यांच्यात मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला. मात्र, रेश्माच्या कुटुंबीयांनी लग्नाला नकार दिल्यानंतर, पळून जाऊन लग्न करण्याबाबत तरुणाने तगादा लावला. रेश्माही त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्यासोबत पळून आली. तेथेच दोघांनी लग्न केले.लग्नाच्या पहिल्याच दिवशी तो तिला मुंबईतील कामाठीपुरा येथील शांती बद्री थापा या महिलेच्या कुंटणखान्यात घेऊन आला. थापा ही आपली मावशी असून, काही दिवस तिच्याकडेच राहावे लागणार असल्याचे त्याने सांगितले. रेश्मानेही होकार दिला. आपण बाजारातून खरेदी करून येईपर्यंत येथे आराम कर, असे सांगून बाहेर पडला आणि तो परतलाच नाही.आपला कुंटणखान्यात सौदा झाल्याबाबत रेश्मा अनभिज्ञ होती. रात्रीच्या अंधारात पतीऐवजी अनोळखी पुरुषाने तिच्या खोलीत प्रवेश केल्यानंतरच तिला त्याबाबत समजले आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, मारहाण करून तिच्यावर बळजबरी करण्यात आली. बंद खोलीत तिच्यावर बलात्कार झाला.दुसरीकडे मुलीसोबतचा संपर्कच तुटल्याने तिच्या कुटुंबीयांनी पश्चिम बंगालमधील पोलीस ठाण्यात तिला पळवून नेल्याबाबत तक्रार दिली. शनिवारी रेस्क्यू फाउंडेशनच्या शायिनी पडियार यांना याबाबत माहिती मिळाली आणि त्यांनी नागपाडा पोलिसांना या प्रकाराबाबत कळविले.ग्राहकामागे झाला होता सौदाआरोपीने ग्राहकामागे रेश्माचा सौदा केला होता. प्रत्येक ग्राहकाकडून येणाऱ्या रकमेतील एक हिस्सा त्याला देण्यात यावा, असे ठरले होते, अशी माहितीही थापा हिच्या चौकशीतून समोर आली आहे.अशी झाली सुटकाघटनेचे गांभीर्य लक्षात घेत, नागपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय बसवत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय किरण पगारे यांच्या पथकाने तपास सुरू केला. रविवारी पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून रेश्माची माहिती मिळविली. एका बंद खोलीत जखमी अवस्थेत रेश्मा असल्याचे समजताच, नागपाडा पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून रेश्माची सुटका केली. दीड महिन्यानंतर सुटका झाल्यानंतर रेश्माने हंबरडाच फोडला.थापाला अटक : नागपाडा पोलिसांनी शांती बद्री थापा या दलाल महिलेला बेड्या ठोकल्या आहेत. तिने आतापर्यंत अशा अनेक मुलींना वेश्याव्यवसायात ढकलल्याचा संशय पोलिसांना आहे, तसेच रेश्माचा सौदा करणाºया आरोपीचाही शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बसवत यांनी दिली.

टॅग्स :गुन्हा