पहिल्याच सभेमध्ये विरोधक झाले आक्रमक
By Admin | Updated: May 10, 2015 04:33 IST2015-05-10T04:33:02+5:302015-05-10T04:33:02+5:30
महापालिकेच्या सभागृहात विरोधी पक्ष बळकट बनला आहे. शिवसेनेमध्ये अनेक दिग्गज व अनुभवी नगरसेवकांचा समावेश आहे.

पहिल्याच सभेमध्ये विरोधक झाले आक्रमक
नवी मुंबई : महापालिकेच्या सभागृहात विरोधी पक्ष बळकट बनला आहे. शिवसेनेमध्ये अनेक दिग्गज व अनुभवी नगरसेवकांचा समावेश आहे. पहिल्याच सभेमध्ये विरोधकांनी आक्रमक होऊन पीठासीन अधिकाऱ्यांच्या चुकांवर आक्षेप घेतला. त्यामुळे मतमोजणीची पद्धत बदलावी लागली.
नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये यापूर्वी सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसला स्पष्ट बहुमत असल्यामुळे विरोधी पक्ष दुबळा ठरत होता. परंतु यावेळी विरोधी पक्षामध्ये विजय चौगुले, नामदेव भगत, एम. के. मढवी, शिवराम पाटील, संजू वाडे व इतर अनेक दिग्गज नगरसेवक आहेत. पालिकेच्या कामकाजाचा त्यांना अनुभव आहे. पहिल्याच सभेमध्ये त्याचा अनुभव आला. पीठासीन अधिकारी सुमंत भांगे यांनी मतमोजणी करताना शिवसेनेच्या नगरसेवकांची नावे घेऊन त्यांची नोंद सुरू केली. राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठीही तीच पद्धत सुरू केली. यावर नामदेव भगत यांनी आक्षेप घेतला. पीठासीन अधिकाऱ्यांना तुमची पद्धत चुकीची असल्याचे ठणकावून सांगितले. तुम्ही थेट पक्षनिहाय नावे घेत आहात. तेच नगरसेवक संबंधित उमेदवारांना मतदान करणार हे तुम्हाला कोणी सांगितले. शिवराम पाटील, विजय चौगुले यांनीही यावर आक्षेप घेतला. यामुळे पीठासीन अधिकारी सुमंत भांगे यांनी प्रत्येक नगरसेवकांना त्यांचे नाव व प्रभाग सांगून कोणाला मतदान करणार, हे स्पष्ट करण्यास सांगितले. यामुळे प्रक्रिया वेळखाऊ ठरली, परंतु विरोधी पक्षामध्ये मात्र आपला विजय झाल्याचे स्पष्ट दिसत होते.
सचिव विभागाच्या कामकाजावरही आक्षेप नोंदविले. विरोधकांच्या आक्रमकतेमुळे पाच वर्षे विविध मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांना घेरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.