Join us  

PM नरेंद्र मोदी यांना पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर; सर्वोत्कृष्ट देश, जनसेवेची दखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 11:25 PM

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे.

मुंबई: मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा पहिला लता मंगेशकर (Lata Dinanath Mangeshkar Award) पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. तसेच गायक राहुल देशपांडे (Rahul Deshpande) यांना भारतीय संगीतातील योगदानासाठी मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोहळा २४ एप्रिल रोजी माटुंगा येथील षण्मुखानंद हॉल येथे पार पडणार आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी यासंदर्भात माहिती दिली. 

लतादीदी तिच्या गाण्यांच्या रूपाने आपल्यासोबत आहे. ती गेलेली नाही. गायनाचे पर्व संपले तरी हा युगांत नाही तर हे ‘लतायुग’ सुरू झाले आहे. हे लतायुग अनेक तरूणांना प्रेरणा देणार आहे, अशी भावना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी यावेळी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षीपासून सुरू झालेल्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले आहेत. सर्वोत्कृष्ट देशसेवा आणि जनसेवेसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. उत्कृष्ट संगीत कारकीर्दीसाठी गायक राहुल देशपांडे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. भारतरत्न लतादीदींच्या स्मरणार्थ आणि स्मृतीप्रीत्यर्थ यावर्षीपासून पुरस्कार देण्याचे ठरवले आहे. हा पुरस्कार "लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार" म्हणून ओळखला जाईल आणि तो दरवर्षी दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतिदिनी प्रदान केला जाणार आहे.

नरेंद्र मोदी हे दीदीला बहीण मानायचे

नरेंद्र मोदी हे दीदीला बहीण मानायचे. जेव्हा आम्ही दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची उभारणी केली, तेव्हा नरेंद्र मोदी हे उद्घाटनप्रसंगी आले होते. तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी दीदी असे म्हणाली होती की तिची इच्छा आहे की, नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान व्हावे. या तिच्या वक्तव्यावर अनेकांनी टीका केली होती. लतादीदी ही सरस्वती होती आणि तिच्या मुखातून उमटलेले हे शब्द खरे ठरले. नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार द्यावा हे आम्ही आमचे कर्तव्यच समजतो. जगाच्या पाठीवर त्यांनी त्यांचे काम पोहोचवले आहे हे जगाने मान्य केले आहे, या शब्दांत हृदयनाथ मंगेशकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

दरम्यान, २४ एप्रिल रोजी मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची ८० वी पुण्यतिथी साजरी होणार असून, त्यानिमित्ताने मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावेळी पंडित हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, भारती मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर आणि हृदयेश आर्ट्सचे अविनाश प्रभावळकर उपस्थित होते. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित या पुरस्कारांचे वितरण २४ एप्रिल रोजी षण्मुखानंद हॉल येथे सायंकाळी ६ वाजता संपन्न होणार आहे. उषा मंगेशकर अध्यक्षा कार्यक्रमाच्या अध्यक्षा असून. त्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. स्वरलतांजली या खास कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे. 

टॅग्स :नरेंद्र मोदीलता मंगेशकरहृदयनाथ मंगेशकर