Join us
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या आठ दिवसांत मोनो रेल्वेतून १ लाख ९८ हजार ५२५ जणांनी केला प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 01:15 IST

मोनो रेल्वेला यातून ३६ लाख ८ हजार ६६२ रुपये महसूल प्राप्त झाला

मुंबई : मोनो रेल्वेचा चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक हा संपूर्ण टप्पा सुरू झाल्यापासून पहिल्या आठ दिवसांत मोनो रेल्वेमधून १ लाख ९८ हजार ५२५ प्रवाशांनी प्रवास केला आहे. महत्त्वाचे म्हणजे मोनो रेल्वेला यातून ३६ लाख ८ हजार ६६२ रुपये महसूल प्राप्त झाला.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मोनो रेल्वेचा प्रकल्प राबविला जात आहे. प्रथमत: हा प्रकल्प स्कोमीद्वारे चेंबूर ते वडाळा या मार्गावर राबविण्यात आला. वडाळा ते संत गाडगे महाराज चौक हा दुसरा टप्पा सुरू करण्यासाठी कित्येक वर्षे लोटली. अखेर पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वडाळा ते संत गाडगे महाराज चौक हा दुसरा टप्पाही सुरू झाला. हा टप्पा सुरू करण्यापूर्वी यातून स्कोमी बाहेर फेकली गेली; आणि दुसरा टप्पा प्राधिकरणाने स्वत: राबविला. मागील आठवड्यात संपूर्ण म्हणजे चेंबूर - वडाळा - संत गाडगे महाराज चौक या मार्गावर मोनो रेल्वे धावू लागली; आणि प्रवाशांना दिलासा मिळाला. मोनो रेल्वे संपूर्ण मार्गावर धावू लागल्यानंतर पहिले दोन दिवस याद्वारे ‘जॉय राईड’च झाली. मात्र कालांतराने म्हणजे मागील सहा दिवसांपासून ‘जॉय राईड’व्यतिरिक्तही मोनो रेल्वेचा वापर प्रवाशांकडून सुरू झाला. विशेषत: मध्य मुंबईतील महालक्ष्मीपर्यंत मोनो रेल्वेने प्रवास करणे शक्य झाल्याने तिचा वापर वाढू लागला आहे.शिवाय लोअर परळ येथील कॉर्पोरेट हबसह कार्यालयीन कर्मचारी वर्गाकडूनही पुरेसा प्रतिसाद मिळाल्याने प्रथमदर्शनी तरी मोनो रेल्वेचा वापर प्रवाशांकडून होत असल्याचे चित्र आहे.मोनो रेल्वेचा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्या वाढेल याची खात्री होती. आम्ही आणखी टेÑन्स सेवेत दाखल करणार आहोत. दोन गाड्यांमधील वेळही कमी करणार आहोत. प्रत्येक स्थानकावर पिण्याचे पाणी आणि बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.- दिलीप कवठकर,प्रकल्प संचालक, एमएमआरडीएमोनो रेल्वे दररोज सकाळी ६ वाजता चेंबूर आणि संत गाडगे महाराज चौक येथून सुरू होते. रात्री १० वाजता वडाळा डेपो येथे रोजचा प्रवास थांबविते.

टॅग्स :मोनो रेल्वे