लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पश्चिम रेल्वेने मुंबईतील प्रमुख स्थानकांवर डिजिटल लाउंज म्हणजेच विश्रामगृह कम को-वर्किंग स्पेस उभारण्याचा जानेवारीत निर्णय घेतला होता. त्यानुसार आता मुंबई सेंट्रल स्थानकामध्ये भारतातील पहिले डिजिटल लाउंज उभारण्याची तयारी करण्यात आली आहे. यासाठी कंत्राटदार नेमण्यात आला असून या स्थानकात २.७१ कोटी रुपयांच्या खर्चातून १७१२ चौरस फूट जागा विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काळात प्रवाशांना विमानतळासारख्या सुविधा मिळणार असल्याचे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
भारतीय रेल्वेमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचे लाउंज बांधले जात आहेत. प्रवाशांना त्यांचे ऑफिस आणि कॉलेजचे काम आरामात करता यावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या, स्थानकांवरील प्रतीक्षालयांमध्ये बसून प्रवासी ट्रेनची वाट पाहू शकतात. तसेच जास्त पैसे देऊन एक्झिक्युटिव्ह लाउंजमध्ये आराम करू शकतात, पण तिथे ऑफिसचे काम आरामात करता येत नाही. ती सुविधा पश्चिम रेल्वेच्या डिजिटल लाउंजमध्ये मिळणार आहे. या सुविधेतून दरवर्षी रेल्वेला सुमारे ५० लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल, असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
विमानतळासारख्या अत्याधुनिक सुविधा
हे लाउंज विमानतळाइतकेच आधुनिक असेल. प्रवाशांना येथे चार्जिंगसाठी प्लग पॉइंट्स, वायफाय, टेबल आणि सोफा यासारख्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या जातील. विशेष म्हणजे ते कोणत्याही व्यत्ययाशिवाय काम करू शकतात.
अशा असतील सुविधा
मोफत वीज, काम करण्यासाठी खुर्ची-टेबल, वायफाय, प्लग पॉइंट, कॅफे
नागरिकांनाही लाभ मिळणार
शहरात अनेक व्यावसायिक आणि फ्रीलांसर घरून काम करतात. मात्र, घरी योग्य सुविधा मिळत नसल्यामुळे आता हॉटेल किंवा कॅफेमध्ये काम करण्याचे प्रमाण वाढले आहे. हीच सुविधा मुंबई सेंट्रलमध्ये उभारण्यात येणाऱ्या या व्यवस्थेत मिळेल. प्रवाशांसाठीच नाही तर बाहेरील लोकांसाठीही ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
पायलट प्रोजेक्ट म्हणून मुंबई सेंट्रल स्टेशनची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर वांद्रे टर्मिनस, वडोदरा, अहमदाबाद अशा इतर प्रमुख स्थानकांवर देखील अशी सुविधा निर्माण करण्यात येईल. - विनीत अभिषेक, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे.