The first day of the backlog exams was a mess | बॅकलॉगच्या परीक्षांचा पहिला दिवस गोंधळाचा

बॅकलॉगच्या परीक्षांचा पहिला दिवस गोंधळाचा

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या बॅकलॉगच्या परीक्षा शुक्रवारपासून सुरू झाल्या. पहिल्यांदाच विद्यापीठ महाविद्यालयांकडून आॅनलाइन परीक्षा घेतल्या जात असल्याने, अनेक ठिकाणी तांत्रिक कारणांचा फटका परीक्षांना बसला. काही ठिकाणी आॅनलाइन परीक्षा सुरू झाल्यानंतरही अनेक विद्यार्थ्यांना लिंक न मिळाल्याने, परीक्षा रद्द करून पुढे ढकलण्याची वेळ महाविद्यालयांवर आली, तर काही ठिकाणी परीक्षा सुरळीत पार पडली.


मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, विद्यापीठ शैक्षणिक विभाग आणि दूर व मुक्त अध्ययन संस्थेतील तब्बल ७२ हजार ५०० विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. बॅकलॉग आणि नियमित परीक्षांच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठाने विद्याशाखानिहाय महाविद्यालयांचे ९४ क्लस्टर निर्माण केले आहेत. समूह महाविद्यालयांनी त्यांच्या वेळापत्रकानुसार बॅकलॉगच्या परीक्षांचे यशस्वी आयोजन करणे अपेक्षित आहे. आॅनलाइन परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाकडून एका खासगी कंपनीची नियुक्ती केली आहे. त्यानुसार, या कंपनीकडून विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी सराव प्रश्नसंच, हॉलतिकीट पाठविणे, त्यांना परीक्षेसाठी लिंक पाठविणे अशी जबाबदारी होती, परंतु सकाळी १० वाजता असलेल्या लाइफ सायन्स परीक्षेच्या अनेक विद्यार्थ्यांना दुपारी १२ वाजेपर्यंत लिंकच मिळाली नाही. त्यामुळे पेपर कसा द्यायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता.


विद्यार्थ्यांनी बायकॉट केलेल्या एजन्सीला कंत्राट
मुंबई विद्यापीठाने आॅनलाइन परीक्षा घेण्याचे कंत्राट मणीपालमधील एका एजन्सीला दिले आहे, परंतु सीस्टिम तकलादू असल्याने तेथील विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी ही सीस्टिम रद्द करण्यासाठी आंदोलन केले होते. त्याच एजन्सीला मुंबई विद्यापीठाने परीक्षा घेण्याचे कंत्राट दिले. त्यामुळे गोंधळ उडाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे.

पुन्हा मिळणार परीक्षेची संधी
काही अपरिहार्य किंवा तांत्रिक कारणास्तव एखादा विद्यार्थी परीक्षेला बसू शकला नसेल, तर त्याला परीक्षेसाठी पुन्हा संधी दिली जाईल. लिंक न मिळालेल्या विद्यार्थ्यांची दुसऱ्या टप्प्यात परीक्षा घेण्यात येईल..
- विनोद पाटील, परीक्षा नियंत्रक, मुंबई विद्यापीठ

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The first day of the backlog exams was a mess

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.