फर्स्ट क्लास महागणार ?
By Admin | Updated: March 3, 2015 02:38 IST2015-03-03T02:38:03+5:302015-03-03T02:38:03+5:30
रेल्वे भाडेवाढ होणार की नाही, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले असतानाच कुठलीही भाडेवाढ होणार नसल्याचे अर्थसंकल्पातून जाहीर केले आणि प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

फर्स्ट क्लास महागणार ?
मुंबई : रेल्वे भाडेवाढ होणार की नाही, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले असतानाच कुठलीही भाडेवाढ होणार नसल्याचे अर्थसंकल्पातून जाहीर केले आणि प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सर्वसाधारण अर्थसंकल्पात
सेवाकर वाढवण्याची शिफारस केल्याने त्याचा परिणाम उपनगरीय लोकलचा फर्स्ट क्लास आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील एसी तिकीट सेवेवर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामध्ये साधारपणे पाच ते पंधरा रुपयांची वाढ असेल, असे रेल्वेतील सूत्रांकडून सांगण्यात आले.
भाजपाची केंद्रात एकहाती सत्ता येताच ‘अच्छे दिन आयेंगे’ असे सांगत अनेक स्वप्नं दाखवण्यात आली. पण सत्ता येताच पहिल्या रेल्वे अर्थसंकल्पात दुप्पट भाडेवाढ करण्यात आली आणि त्याचा मुंबईकरांना मोठा फटका बसला. पास आणि तिकीट शुल्कात वाढ झाल्याने त्याला उपनगरीय लोकल प्रवाशांनी विरोध केला. त्यामुळे मोठी भाडेवाढ मागे घेऊन अल्प भाडेवाढच लागू केली. दरम्यान, रेल्वे मोठ्या आर्थिक संकटातून जात असल्याने नुकत्याच सादर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्पातही भाडेवाढ होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना कोणतीही भाडेवाढ होणार नसल्याचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगून दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
परंतु दुसरीकडे केंद्रीय अर्थसंकल्पात सेवाकर वाढविण्याच्या निर्णयामुळे रेल्वे प्रवाशांना त्याचा फटका बसणार आहे. याच नवीन वाढीव सेवाकरामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास महागणार आहे. यात उपनगरीय फर्स्ट क्लासचा पास आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांमधील एसी फर्स्ट, एक्सिक्युटिव्ह क्लास, सेकंड आणि थर्ड एसी, एसी चेयर कार, एसी इकॉनॉमी क्लासचे तिकीट महागण्याची शक्यता आहे.
ही दरवाढ साधारणपणे पाच ते पंधरा रुपये असेल असे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. मात्र अधिवेशनात सर्वसाधारण अर्थसंकल्पावर चर्चा होऊन त्याला मंजुरी मिळाल्यानंतरच तो लागू होईल, असे सांगण्यात
आले. (प्रतिनिधी)
सध्या लोकलच्या फर्स्ट क्लास पासावर आणि एसी तिकिटावर सध्या सेवाकर हा १२.३६ टक्के असून, त्यामध्ये ७० टक्के सूट देण्यात येते आणि तो कर ३.७०८ एवढा आकारला जातो.
आता सर्वसाधारण अर्थसंकल्पात मात्र हाच कर जवळपास
१४ टक्के एवढा होणार असून, त्यामध्ये नेहमीप्रमाणे ७० टक्के सूट दिल्यानंतर ४.२ टक्के एवढा होईल. ही वाढ एप्रिल महिन्यापासून होईल, असे सूत्रांनी सांगितले.