रोहित नाईकलोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील काही मैदानांवर विविध क्रीडा संघटनांकडून नियमितपणे सराव, शिबिरे आणि स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्यामुळे ही मैदाने चांगल्या स्थितीत आहेत. मात्र, शिवाजी पार्क, आझाद मैदान यांसारखी मोठी मैदाने खेळांसह सभा, संमेलने, राजकीय मेळावे तसेच इतर गोष्टींसाठीही वापरली जात असल्याने अनेकदा क्रीडा संघटनांना मनस्ताप सहन करावा लागतो.
नोव्हेंबर ते फेब्रुवारी-मार्चदरम्यानचा कालावधी विविध महोत्सवांचा असतो. या दरम्यान, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शने, खासगी कार्यक्रम यांसाठी अनेक मैदाने भाडेतत्त्वावर घेतली जातात. व्यासाठी मैदानांवर मंडप, स्टेज उभारले जातात. यामुळे मैदानांचे काही प्रमाणात नुकसानही होते. कार्यक्रम झाल्यानंतर सामानांची आवराआवर होते, परंतु खड्डे मात्र तसेच राहतात. मुंबईत खेळांसाठी पुरेशी जागा नसताना काही मैदानेही इतर कार्यक्रमांसाठी दिली जात असल्याने याचा फटका नवोदित खेळाडूंना बसतो, अशी नाराजी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
मैदान एक दिवस भाडेतत्त्वावर घेतले तरी, आयोजनाची तयारी आणि समारोपासाठी ते चार-पाच दिवस ताब्यात ठेवले जाते.
चार-पाच किलो खिळे
शिवाजी पार्कसारखे मैदान भाड्याने दिले जाते, तेव्हा चार-पाच किलो खिळे मैदानात सापडतात ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे, एक नियमावली आखली पाहिजे. संबंधित कार्यक्रमादरम्यान मैदानातील विशेष भाग, उदा. क्रिकेटची खेळपट्टी, कबड्डीचे मैदान यावर कोणतीही वस्तू आणता कामा नये. खड्डेही बुजवले जात नाही, अशी खंतही भास्कर सावंत यांनी व्यक्त केली.
तुकड्या-तुकड्यांत स्पर्धा
१. मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी आझाद मैदानातील २२ पैकी तब्बल १५ क्रिकेट मैदानांचा भाग घेण्यात आला होता. हा प्रकल्प आता पूर्ण होऊनही हा भाग परत दिला गेलेला नाही. फोर्ट विजय क्रिकेट क्लबचे मैदान विविध मोर्चासाठी अनिवार्य थांबा म्हणून घोषित केले आहे.
२. मैदानाचा मोठा भाग यामुळे पोलिसांच्या ताब्यात गेला. परिणामी मुंबई क्रिकेटमधील सर्वांत प्रतिष्ठित कांगा लीग तुकड्या-तुकड्यांमध्ये पूर्ण करावी लागत आहे, अशी खंत 'एमएसएसए'चे क्रिकेट सचिव आणि मुंबई क्रिकेट संघटनेचे (एमसीए) अॅपेक्स कौन्सिल सदस्य नदीम मेमन यांनी 'लोकमत'कडे व्यक्त केली.
"मुंबई महापालिका मैदाने भाड्याने देते. हा पैसा त्यांच्या डागडुजीसाठी का वापरला जात नाही? देखभालीसाठी जो कोणी अधिकारी नेमला जातो, त्याने मैदानाची काळजी घ्यावी. त्याशिवाय मैदाने टिकणार नाहीत. नाहीतर आमच्या महापालिकेत नेहमीच्या फेऱ्या आहेतच ठरलेल्या."- भास्कर सावंत, मैदान बचाव समिती, संस्थापक-अध्यक्ष
"विविध कार्यक्रमांमुळे आझाद मैदानावरील क्रिकेट खेळपट्ट्यांवर तात्पुरती बांधकामे होतात. मैदानांचे होणारे नुकसान दीर्घकाळ भरून निघत नाही. चौपाटी, वांद्रे-कुर्ला संकुल परिसर, चुन्नाभट्टी महामार्ग परिसर अशा ठिकाणी मोकळी जमीन उपलब्ध असूनही मोठमोठे सोहळे क्रीडांगणावरच आयोजित होतात. त्यामुळे राज्य शासनाने आता मैदाने केवळ खेळांसाठी आरक्षित राहतील, असा जीआर काढणे आवश्यक बनले आहे."- नदीम मेमन, क्रिकेट सचिव, मुंबई शालेय क्रीडा संघटना
Web Summary : Mumbai's sports grounds are often used for non-sporting events, damaging fields and disrupting training. Experts worry this hinders young athletes' development. They urge reserving grounds solely for sports to nurture future talent.
Web Summary : मुंबई के खेल मैदान अक्सर गैर-खेल आयोजनों के लिए उपयोग किए जाते हैं, जिससे मैदान क्षतिग्रस्त होते हैं और प्रशिक्षण बाधित होता है। विशेषज्ञों को चिंता है कि इससे युवा एथलीटों का विकास बाधित होता है। वे भविष्य की प्रतिभाओं को पोषित करने के लिए मैदानों को केवल खेलों के लिए आरक्षित करने का आग्रह करते हैं।