रिक्षाचालकावर गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2016 05:08 IST2016-06-18T05:08:11+5:302016-06-18T05:08:11+5:30
रस्त्यालगत रिक्षा उभी करून लघुशंकेसाठी गेलेल्या रिक्षाचालकावर भरदुपारी गोळीबार झाल्याची घटना गुरुवारी घाटकोपर येथे घडली. सलीम शेख असे या घटनेत जखमी झालेल्या रिक्षाचालकाचे

रिक्षाचालकावर गोळीबार
मुंबई : रस्त्यालगत रिक्षा उभी करून लघुशंकेसाठी गेलेल्या रिक्षाचालकावर भरदुपारी गोळीबार झाल्याची घटना गुरुवारी घाटकोपर येथे घडली. सलीम शेख असे या घटनेत जखमी झालेल्या रिक्षाचालकाचे नाव असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत टिळक नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गोवंडीच्या शिवाजी नगर येथे राहणारा सलीम शेख गुरुवारी दुपारी एका प्रवाशाला सोडण्यासाठी घाटकोपर परिसरात गेला होता. तासाभरात पुन्हा तो शिवाजी नगरच्या दिशेने येत होता. याचवेळी येथील बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाजवळ त्याने रिक्षा थांबवली. त्यानंतर लघुशंकेसाठी तो लगतच्या नाल्याजवळ गेला. त्याचवेळी बाजूने गेलेल्या एका कारमधून त्याच्यावर गोळी झाडण्यात आली. सलीमच्या खांद्यामधून ही गोळी आरपार गेली. मात्र एखादा दगड लागला असावा, असा भास त्याला झाला. परंतु काही वेळातच खांद्यातून रक्तस्त्राव होऊ लागल्याने त्याने रिक्षाने चेंबूरमधील खासगी रुग्णालय गाठले.
महत्त्वाची बाब म्हणजे खासगी रुग्णालयात शिकाऊ डॉक्टर असल्याने त्यालाही ही जखम गोळी लागल्याची आहे, हे लक्षात आले नाही. परिणामी रात्री उशिरा रुग्णालयाचे मुख्य डॉक्टर तेथे आल्यानंतर त्यांनी ही जखम गोळी लागल्याची असल्याचे सांगितले. त्यानुसार प्रथमत: याची माहिती शिवाजी नगर पोलिसांना देण्यात आली. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. मात्र ही हद्द टिळक नगर पोलिसांची असल्याने संबंधितांना ही माहिती कळवण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी पहाटे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान, रिक्षाचालक आपला जबाब वारंवार बदलत असल्याने तसेच सीसीटीव्ही नसल्याने पोलिस तपासात अडथळे येत आहेत. (प्रतिनिधी)