चेंबूरच्या सुराणा रुग्णालयाला आग
By Admin | Updated: September 21, 2015 02:18 IST2015-09-21T02:18:11+5:302015-09-21T02:18:11+5:30
एसीमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे चेंबूरमधील सुराणा रुग्णालयात आज भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये एकच धावपळ उडाली.

चेंबूरच्या सुराणा रुग्णालयाला आग
मुंबई: एसीमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे चेंबूरमधील सुराणा रुग्णालयात आज भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये एकच धावपळ उडाली. मात्र पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिक रहिवाशांनी वेळीच मदत केल्याने यात कोणीही गंभीर जखमी झाले नाही.
रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास येथील पाचव्या मजल्यावरील एका एसीला शॉर्टसर्किट होऊन आग लागली. काही वेळातच ही आग संपूर्ण खोलीत पसरली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ ही माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला दिली. त्यानुसार चुनाभट्टी पोलीस आणि अग्निशमन दलाचे १० फायर इंजिन, रुग्णवाहिका आणि दोन टीटीएल घटनास्थळी दाखल झाले. रुग्णालयात यावेळी ३० ते ३५ रुग्ण उपचार घेत होते. आगीची माहिती मिळताच या रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची एकच धावपळ उडाली. मात्र स्थानिक रहिवाशी आणि पोलिसांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांची मदत करत सर्व रुग्णांना बाहेर काढले. यावेळी सातव्या आणि आठव्या मजल्यावर देखील काही रुग्ण अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी टीटीएलच्या मदतीने रुग्णालयातील काचा फोडून या सर्व रुग्णांना सुखरुप बाहेर काढले. त्यानंतर या रुग्णांना इतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
(प्रतिनिधी)