वांद्रे येथील शास्त्रीनगरमध्ये आग
By Admin | Updated: April 26, 2015 00:47 IST2015-04-26T00:47:11+5:302015-04-26T00:47:11+5:30
वांद्रे पश्चिमेकडील रेल्वे स्थानकालगतच्या शास्त्रीनगर झोपडपट्टीला शनिवारी रात्री भीषण आग लागली.

वांद्रे येथील शास्त्रीनगरमध्ये आग
वांद्रे पश्चिमेकडील रेल्वे स्थानकालगतच्या शास्त्रीनगर झोपडपट्टीला शनिवारी रात्री भीषण आग लागली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या १२ गाड्या आणि जवान रात्री उशिरापर्यंत शर्थ करत होते. सुदैवाने या आगीत वित्तहानी झाली असली तरी मनुष्यहानी झालेली नाही. दरम्यान, आगीमुळे पश्चिम उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती.
शास्त्रीनगर येथील झोपडपट्टी मोठ्या दाटीवाटीने वसलेली असून, या झोपडपट्टीला शनिवारी रात्री ८.३७ वाजता मोठी आग लागली. आगीची माहिती मिळताच ती विझविण्यासाठी अग्निशमन दलाने आवश्यक साहित्य घटनास्थळी तातडीने धाडले. तासाभरात आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले. आग पसरू नये यासाठीचे प्रयत्न सुरू करण्यात आले. लगतच्या परिसराला हानी पोहोचू नये आणि मनुष्यहानी होऊ नये म्हणून हा परिसर रिकामा करण्यात आला होता. झोपड्यांमधील गॅस सिलेंडरही बाहेर काढून दूरवर नेण्यात आले.
या आगीची झळ वांद्रे स्थानकातील फलाट क्रमांक एकला बसली. त्यामुळे बोरीवलीकडे जाणारी लोकलची वाहतूक काही काळ थांबविण्यात आली होती. तसेच रेल्वेने वीजपुरवठाही खंडित केला होता. यामुळे घरी परतणारे चाकरमानी वांद्रे स्थानकात खोळंबले. दरम्यान, आगीमागचे कारण अद्याप समजू शकले नसून, पुढील तपास सुरू आहे, असे अग्निशमन दलाने सांगितले.