Join us  

Fire In Mumbai : मुंबई इमारत आगप्रकरणी दोषींवर कारवाई होणार, महापौर अन् आयुक्तांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 6:14 PM

महापौर किशोरी पेडणेकर, महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी घटनास्थळी दिली भेट

ठळक मुद्देवन अविघ्न पार्क ही तळमजला अधिक ६० अशी बहुमजली इमारत आहे. या इमारतीच्या १९ व्या मजल्यावर आज दुपारी ११.४५ वाजता आग लागल्याची माहिती महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दल नियंत्रण कक्षास प्राप्त झाली.

मुंबई : करीरोड येथील महादेव पालव मार्गावर स्थित वन अविघ्न पार्क या बहुमजली इमारतीमध्ये आज (दिनांक २२ ऑक्टोबर २०२१) दुपारी आग लागल्यानंतर मुंबईच्यामहापौर किशोरी पेडणकर, महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंग चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली तसेच यंत्रणेला आवश्यक ते निर्देश दिले. दरम्यान, या आगीप्रकरणी रहिवाशांनी केलेल्या तक्रारीची योग्य दखल घेण्यात आली असून तथ्य आढळल्यास जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले. आगीच्या घटनेची संपूर्ण प्रशासकीय चौकशी करण्यात येईल. तसेच तक्रारीची पडताळणी करुन त्यात तथ्य आढळले तर संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असे महानगरपालिका आयुक्त  इकबाल सिंग चहल यांनी सांगितले.

वन अविघ्न पार्क ही तळमजला अधिक ६० अशी बहुमजली इमारत आहे. या इमारतीच्या १९ व्या मजल्यावर आज दुपारी ११.४५ वाजता आग लागल्याची माहिती महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दल नियंत्रण कक्षास प्राप्त झाली. त्यानंतर मुंबई अग्निशमन दलासह सर्व संबंधीत यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. आगीचे स्वरुप वाढल्याने इतर ठिकाणांहून देखील अग्निशमन यंत्रणा पाचारण करण्यात आली. सुमारे १४ फायर इंजिन, ९ जम्बो टँकर, १ नियंत्रण कक्ष वाहन, ९० मीटर उंचीची १ आणि ५५ मीटर उंचीची १ अशा २ शिडी (स्कायलिफ्ट) आदी मिळून सुमारे ४० वाहने घटनास्थळी तैनात होती. या यंत्रणेसह अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रयत्नांची शर्थ करुन दुपारी साधारणतः ३.३० वाजता आगीवर नियंत्रण मिळविले. तर ४.५८ वाजता आग पूर्णपणे शमली. या दरम्यान अग्निशमन दलाने इमारतीतून १६ नागरिकांची सुखरुप सुटका केली. तत्पूर्वी, जीव वाचविण्याच्या प्रयत्नात १९ व्या मजल्यावरुन खिडकीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत असलेल्या एका व्यक्तिचा दुर्दैवाने मृत्यू ओढवला आहे.  

घटनास्थळी आमदार अजय चौधरी, महानगरपालिकेचे स्थापत्य समिती (शहर) अध्यक्ष दत्ता पोंगडे, नगरसेविका सिंधू मसुरकर यांनीही भेट दिली. उपायुक्त (परिमंडळ २) हर्षद काळे, उपायुक्त (परिमंडळ १) विजय बालमवार, एफ/ दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर तसेच प्रमुख अग्निशमन अधिकारी हेमंत परब यांनी आपसात सर्व समन्वय राखून तसेच योग्यरितीने यंत्रणा कार्यान्वित करुन मदत कार्याला वेग दिला. 

टॅग्स :मुंबईआगमहापौरकिशोरी पेडणेकर