Join us  

मुंबईजवळील बुचर बेटावरील इंधनाच्या टाकीला भीषण आग, अग्नितांडव शमवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2017 7:52 AM

मुंबई जवळच्या बुचर बेटावरच्या समुद्रातील तेलाचा साठा करणाऱ्या टाक्यांना आग लागली आहे.  शुक्रवारी संध्याकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

मुंबई  -  मुंबई जवळच्या बुचर बेटावरच्या समुद्रातील तेलाचा साठा करणाऱ्या टाक्यांना आग लागली आहे.  शुक्रवारी संध्याकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आग लागण्याच्या घटनेला 15 तासांहून अधिक काळ उलटला आहे. मात्र हे अग्नितांडव शमलेले नाही. आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आग विझवण्यासाठी 15 तास लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  जवाहर द्वीपावर ही दुर्घटना घडली आहे.  

ही आग मोठी असून गेल्या अनेक तासांपासून तिच्यावर नियंत्रण मिळवण्याचे काम  युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आग नेमकी कशामुळे लागली याबाबत कोणतीही माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. 13 आणि 14 क्रमांकाच्या तेलटाक्यांना आग लागल्याची माहिती समोर आली आहे. 

भाऊच्या धक्क्यापासून अवघ्या काही अंतरावर समुद्रात असणाऱ्या जवाहर द्वीप बेटावरील डिझेल टँकच्या परिसरात शुक्रवारी (6 ऑक्टोबर) वीज कोसळली आणि तेथे असलेल्या डिझेल टँक्सना आग लागली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर डिझेल जळून भस्मसात झाले आहे. या बेटावर 15 ते 20 टँक आहेत.  समुद्रातून तेल काढून मोठ्या जहाजाद्वारे जवाहर द्वीपवर आणली जातात. तेथे डिझेल साठवून ठेवले जाते. शुक्रवारी संध्याकाळी मोठा पाऊस झाला आणि त्याचवेळी तेथे वीज कोसळली. त्यामुळे स्पार्किंग होऊन डिझेल टँकला आग लागली. काही वेळातच ही आग भडकली.

 

टॅग्स :आग