अग्निशमन, अॅम्ब्युलन्स जाण्यासाठी रस्तेच नाही
By Admin | Updated: January 17, 2015 23:17 IST2015-01-17T23:17:55+5:302015-01-17T23:17:55+5:30
एकीकडे रुपादेवी पाड्याची उंच टेकडी आणि दुसरीकडे अव्याहतपणे वाहणारा नाला, अशा परिस्थितीत प्रभाग क्र. १२ मधील रहिवासी सध्या विकासाची गंगा वाहण्याची वाट पाहत आहेत.

अग्निशमन, अॅम्ब्युलन्स जाण्यासाठी रस्तेच नाही
अजित मांडके ल्ल ठाणे
एकीकडे रुपादेवी पाड्याची उंच टेकडी आणि दुसरीकडे अव्याहतपणे वाहणारा नाला, अशा परिस्थितीत प्रभाग क्र. १२ मधील रहिवासी सध्या विकासाची गंगा वाहण्याची वाट पाहत आहेत. मात्र, एमआयडीसी आणि वन विभागाच्या हद्दीत अडकलेल्या या प्रभागाचा विकास पुरता खुंटला असून १०० टक्के प्रभाग हा झोपडपट्टीने व्यापला आहे. त्यामुळे येथे रस्ते, पायवाटा, गटार, शौचालये आदींसह दिवा बत्तीची सोयदेखील अपुरी पडत आहे. त्यात वनविभागाची संरक्षक भिंत अर्धवट राहिल्याने या भागात बिबट्याचा वावर वाढला आहे. सर्वात मोठी बाब म्हणजे एखादी हानी झाली तर त्या ठिकाणी अग्निशमनदलाच्या बंबाबरोबर साधी अॅम्बुलन्सदेखील जाऊ शकणार नाही, असे तुटपुंजे रस्ते येथे आहेत.
प्रभाग क्र. १० प्रमाणेच हा प्रभागदेखील एमआयडीसी आणि वनविभागाच्या हद्दीत येत असून या प्रभागाची लोकसंख्या, १७ हजार ५८० एवढी असून येथे इंदिरानगर, रुपादेवी पाडा, आंबे वाडी, साठे नगर, ज्ञानोदय विद्यामंदिर आदी भागांचा असून येथे राहणाऱ्या लोकवस्तीत ९९ टक्के परप्रातिंयाचा समावेश आहे. डोंगराळवस्ती असल्याने येथे अनेक सोईसुविधांची वाणवा आहे. रस्त्यांची या भागात दयनीय अवस्था आहे. पाण्याची तर पुरती बोंब असून वेळी अवेळी येणाऱ्या पाण्यामुळे येथील रहिवाशांना पाण्यासाठी जागता पहारा द्यावा लागत आहे. रात्री पाणी येत असल्याने, घरातील पाण्याचा नळ सुरु ठेवूनच रहिवाशांना झोपावे लागत आहे. परंतु, यामुळे पाणी वायादेखील जात आहे.
याशिवाय या भागात एमआयडीसीचे एक मैदान आहे, हे मैदान पालिकेला मिळावे म्हणून यासाठी ७२ लाख पालिकेने एमआयडीसीला दिले आहेत. परंतु, या ठिकाणी असलेल्या खाजगी शाळने न्यायालयात धाव घेतल्याने, हे मैदान अद्यापही पालिकेकडे हस्तांतरीत झालेले नाही. हे मैदान मिळाले असते तर किमान या भागातील मुलांना खेळाचे एकमेव मैदान उपलब्ध झाले असते. परंतु ते देखील वादात अडकल्याने मुलांना इतरत्र जावे लागत आहे. उंच टेकडी आणि डोंगरातून वाहणारा नाला, यामुळे या भागात खालच्या बाजूला असलेल्या घरांमध्ये पावसाळ्यात पाणी साचण्याची घटना घडत आहेत. परंतु येथील नाल्याची वेळेवर सफाई देखील केली जात नसल्याचे रहिवाशांचे म्हणने आहे. त्यात खालील बाजूस आठवडा बाजार भरत असल्याने या दिवशी येथे तोबा वाहतूककोंडी होत असते. आंबेवाडी भागातील शौचालयाची पुरती दैना झाली असून, महापालिका शाळा, आरोग्य केंद्र आदींची देखील वाणवा आहे. एखाद्या वेळेस आग लागली अथवा इतर कोणतीही घटना घडली तर अग्निशमन दलाची गाडी देखील जाऊ शकत नाही अशी दयनीय अवस्था या प्रभागाची आहे.
येथील रहिवाशांचे पुनर्वसन जो पर्यंत होत नाही, तो पर्यंत या भागाला सुविधा देणे कठीण आहे. एमआयडीसीचा भुंखंड मिळाल्यास त्याचा फायदा येथील मुलांना होऊ शकतो
- राधा फत्तेबहादुर सिंह - स्थानिक नगरसेविका - शिवसेना
---------------
आयएनडीपी नाल्याची समस्या आहे. रस्ते अरुंद असल्याने अग्निशमन अथवा साधी अॅम्ब्युलन्सदेखील येथे जाऊ शकत नाही. प्रभागातील समस्या सोडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. परंतु, निधीची वाणवा आहे.
- राजकुमार यादव, स्थानिक नगरसेवक - भाजपा