इमारतींची अग्निरोधक यंत्रणा कुचकामी
By Admin | Updated: June 10, 2015 02:49 IST2015-06-10T02:49:38+5:302015-06-10T02:49:38+5:30
आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या उत्तुंग इमारतींमध्ये अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित नसल्याने ८० टक्के दुर्घटनांमध्ये दिसून आले आहे़

इमारतींची अग्निरोधक यंत्रणा कुचकामी
मुंबई : आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या उत्तुंग इमारतींमध्ये अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित नसल्याने ८० टक्के दुर्घटनांमध्ये दिसून आले आहे़ यामुळे तत्काळ मदतकार्याचा मोलाचा वेळ वाया गेल्याचे गंभीर परिणाम निष्पाप जिवांना प्राण गमावून भोगावे लागत आहेत. त्यामुळे अशा दुर्घटनांमध्ये सोसायटी, रहिवासी आणि विकासकाला जबाबदार धरण्याचा सूर अग्निशमन दलातील जवानांनी लावला आहे़
मुंबईतील इमारतींसाठी आकाश ठेंगणे पडू लागले आहे, त्याचवेळी अग्निशमन दलाकडे मात्र ७० मीटर उंच म्हणजेच २२व्या मजल्यांपर्यंत पोहोचू शकेल, एवढी शिडी आहे़ त्याहून उंच इमारतींमध्ये आगीचा भडका उडाल्यास मदतकार्य जिकिरीचे ठरते़ ही अडचण दूर करण्यासाठी अग्निशमन दलाने फिनलँडहून ९० मीटर उंच शिडी आणण्याची तयारी सुरू केली आहे़ पण ही शिडी अग्निशमन दलाच्या ताफ्यात अद्याप दाखल झालेली नाही़ त्यामुळे उपलब्ध शिडीच्या मदतीनेच मदतकार्य सुरू आहे़ मात्र अग्निशमन दलाच्या या बचावकार्यात इमारतींमधील नादुरुस्ती अग्निरोधक यंत्रणा अडथळा आणत आहे़
अग्निरोधक यंत्रांची नियमित देखरेख होत नसल्याने ऐन आपत्ती काळात या यंत्रणा कुचकामी ठरलेल्या असतात़ गेल्या शनिवारी चांदिवली येथील पवई लेक होम सोसायटीमध्ये लागलेली आग पसरण्यास अशाच काही त्रुटी कारणीभूत ठरल्या़ अशा चुका टाळण्यासाठी सोसायटींमध्ये जागरूकता, सुरक्षा रक्षकाला विद्युत पुरवठ्याबाबत माहिती असणे आवश्यक आहे़ इमारतीतील सोसायटीचे पदाधिकारी आणि रहिवाशांनी आपल्या सुरक्षेविषयी जागरूक राहिल्यास अशा आगीमध्ये होणारी जीवितहानी रोखणे शक्य होईल, असा विश्वास जवानांकडून व्यक्त होत आहे़ (प्रतिनिधी)