Join us  

संपूर्ण मुंबईतून फायर इंजिन दाखल झाले; आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 5:58 PM

Fire in Mumbai : सुमारे २५० अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करत होते.

मुंबई : मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलला लागलेली आग शमविण्यासाठी मुंबई महापालिका, पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान प्राणाची बाजी लावून लढले. येथील आग विझविण्यासाठी संपूर्ण मुंबईतून फायर इंजिन घटनास्थळी धाडण्यात आले होते, अशी माहिती अग्निशमन दलानेच दिली. आग शमविताना पाच अग्निशमन दलाचे जवान जखमी झाले असून, जवानांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता मॉलला अगदी लागून असलेल्या ऑर्किड एन्क्लेव या ५५ मजली इमारतीमधील अंदाजे ३ हजार ५०० रहिवाशांचे सुरक्षिततेची आवश्यकता लक्षात घेऊन जवळच्या मैदानामध्ये स्थलांतर केले. सर्वात महत्वाचे म्हणजे येथील आग विझवण्यासाठी सुमारे २५० अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करत होते. आग विझवण्यासाठी २४ फायर इंजिन, १६ जंबो टँकर यांच्यासह एकूण ५० अग्नि विमोचक वाहने तैनात, कार्यरत होती.सेंटर मॉलला लागलेली आग शुक्रवारी  दुपारी ३.३६ वाजता आग कव्हर करण्यात आली. येथील आग कव्हर करताना जवानांनी अथक परिश्रम केले. आग कव्हर करताना ती पसरू नये, याची काळजी घेण्यात आली. मुळात येथील आग कव्हर करताना लगतच्या परिसरातील नागरिकांना याचा त्रास होणार नाही. आगीची झळ बसणार नाही याची काळजी घेण्यात आली. लगतच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या सुमारे ३ हजार लोकांना लगतच्या परिसरात नेण्यात आले. हे करताना पुन्हा येथील वाहतूक व्यवस्था मोडकळीस येणार नाही याची काळजी घेण्यात आली. सकाळी आग शमविताना येथील वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली होती. सुरुवातीला छोटी वाटणारी आग कालांतराने पसरली. मुळात आग लागल्याची माहिती मिळताच घटना स्थळी कोणालाही दुखापत होणार नाही यासाठी काम सुरू झाले. घटना स्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्व यंत्रणा सुरू केल्या. केवळ अग्निशमन दलाचे जवान नाही तर पोलीस, महापालिका कर्मचारी अशा मोठा फौफाट्यासह आग विझवण्यासाठी काम सुरू करण्यात आले. गुरुवारी रात्री आग लागली तेव्हा मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. आणि हाच धूर आग विझवण्यासाठी अडथळा ठरत होता. परिणामी गुरुवारी रात्री छोटी असणारी आग मध्यरात्री भडकली. आणि शुक्रवारी सकाळी देखील त्यावर नियंत्रण मिळविणे कठीण जात होते. शुक्रवारी दुपारी १२ वाजता देखील येथील आग विझवण्यासाठी काम केले जात होते. दिवस भर काम सुरू असतानाच दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास आग कव्हर करण्यात आली. येथील आग विझवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर करण्यात आला. मुंबई महापालिकेच्या ए, सी आणि डी वार्ड मध्ये पाण्याचे टँकर भरण्यात आले. आणि येथून ते घटना स्थळी धाडण्यात आले. या टँकरची संख्या ८० वर होती, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली. या व्यतिरिक्त आग शमविण्यासाठी विविध साधनांचा वापर करण्यात आला. धूर मोठ्या प्रमाणावर बाहेर येत असतानाच फायर ब्रिगेड काम करत होती.मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी आपले काम चोखपणे बजावत येथील आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु ठेवले. या जवानांमध्ये एच.डी. परब, मांजरेकर, चौधरी, ए.च. सावंत, घोष, आर.व्ही. भोसले, डी.एस. पाटील, मयेकर, तळेकर, एम.आर. सुर्वे, आर.व्ही. मोरे, एम.जी. वर्णेकर, इरंडे, यु.वाय.बोबडे, पी.एस. माने, खोपडे, खरटमल, तांडेल, पोळ, एस.एम. कांबळे, डी.एम. पाटील, सकपाळ यांचा समावेश आहे, अशी माहिती मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे यांनी दिली. 

टॅग्स :आगमुंबई महानगरपालिकामुंबई