Join us  

विलेपार्ले येथील इमारतीला आग; चार जणांची सुखरूप सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 3:41 AM

येथे ए आणि बी विंग असून, ए विंगमध्ये आग लागली.

मुंबई : विलेपार्ले येथील बजाज रोडवरील तळमजला अधिक तेरा मजली लाभ श्रीवल्ली या इमारतीच्या सातव्या आणि आठव्या मजल्यावरील दोन ते तीन कार्यालयांना रविवारी रात्री सातच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी चार फायर इंजिन आणि चार जेटींच्या मदतीने आग शमविण्याचे काम हाती घेत दुर्घटनाग्रस्त इमारतीमधून चार जणांची सुखरूप सुटका केली.

येथे ए आणि बी विंग असून, ए विंगमध्ये आग लागली. अग्निशमन दलाने वेळेवर पोहोचत आग शमविण्याचे कार्य हाती घेतल्याने आग पसरली नाही; शिवाय ती नियंत्रणातही आली. आग शमविण्याचे काम सुरू असतानाच सातव्या मजल्यावरून तीन ते चार लोकांची सुटका करण्यात आली. दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या गच्चीवरही कोणी अडकले नसल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. रविवारी रात्री नऊ वाजेपर्यंत येथे शोधकार्य सुरू होते. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही.

दरम्यान बी विंगमधील आठव्या मजल्यावरून एका महिलेलाही अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले. अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त इमारतीची अग्निप्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित नव्हती. आता दुर्घटनाग्रस्त इमारतीचे पाणी आणि वीज खंडीत करण्यात आली आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरु आहे. कमी वेळेत ही आग नियंत्रणात आणल्याचेही दलाकडून सांगण्यात आले. 

टॅग्स :मुंबईविलेपार्लेआग