तब्बल ८ तास धुमसत होती आग
By Admin | Updated: May 11, 2015 03:38 IST2015-05-11T03:38:17+5:302015-05-11T03:38:17+5:30
काळबादेवी येथील गोकूळ इमारतीला लागलेल्या आगीवर आठ तासांनंतर रात्री १२ वाजता नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले.
तब्बल ८ तास धुमसत होती आग
मुंबई : काळबादेवी येथील गोकूळ इमारतीला लागलेल्या आगीवर आठ तासांनंतर रात्री १२ वाजता नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. आठ तास चाललेल्या या आॅपरेशनमध्ये अग्निशमन दलाचे दोन अधिकारी शहीद झाले; तर दोन जण गंभीररीत्या जखमी झाले. कूलिंग आॅपरेशन संपवून डेब्रिज उचलण्याचे काम पहाटे सुरू झाले. रविवारी रात्री उशिरापर्यंत हे काम चालू राहील, अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यांकडून मिळाली.
पहाटे ४च्या सुमारास इमारतीचा उरलेला भाग पाडण्यात आला. यानंतर डेब्रिज उचलण्याचे काम सुरू करण्यात झाले. गोकूळ इमारतीची गल्ली चिंचोळी असल्याने डेब्रिज काढताना एकावेळी एकच डम्पर आत जाऊ शकत आहे. त्यामुळे डेब्रिज पूर्णपणे काढायला वेळ लागणार आहे. उपसलेले डेब्रिज मुंबादेवी परिसरात टाकण्यात येणार आहे. तेथे बंदोबस्तासाठी १० पोलीस तैनात करण्यात आले आहेत. घर, गोदामातील काही मौल्यवान वस्तू असण्याची शक्यता असल्याने सात दिवस हे डेब्रिज ठेवण्यात येणार आहे. पोलिसांचा पंचनामादेखील व्हायचा आहे. यानंतर हे डेब्रिज डम्पिंग ग्राउंडला टाकण्यात येईल, असे सी वॉर्डच्या अधिकारी संगीता हसनाळे यांनी सांगितले.
हसनाळे यांनी पुढे सांगितले की, सध्या १९ डम्पर, ८ जेसीबी डेब्रिज उचलण्यासाठी कार्यरत आहेत. परिसर रिकामा करणे, जमावावर नियंत्रण मिळवणे, ट्रॅफिक पोलिसांना सांगून वाहतूक बंद करणे या प्राथमिक गोष्टी तत्काळ करण्यात आल्या. यानंतर अग्निशामक दलाला असलेल्या पाण्याच्या गरजेनुसार पाणी विभागाला कळवणे, पोलिसांना बोलावणे याचे नियोजन करण्यात आले.
गोकूळ इमारतीचे गेल्या दोन-तीन महिन्यांपासून दुरुस्तीचे काम सुरू होते. गोकूळ इमारतीला लागलेल्या आगीमुळे तिच्या मागच्या इमारतीलादेखील झळा लागल्या आहेत. आग लागल्याचे समजताच मागच्या इमारतीतील सर्व रहिवासी दुसऱ्या बाजूने उतरून गेले. पण समोरची इमारतदेखील रिकामी करण्यात आली आहे. या इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात येणार आहे. यानंतरच त्यांना येथे राहता येईल. या रहिवाशांसाठी चंदनवाडीतील महापालिकेची शाळा उघडण्यात आली होती. पण, स्थानिक आमदार राज पुरोहित यांनी रहिवाशांना राहण्याची सोय केल्याचे समजते.
अग्निशमन दलाच्या प्राथमिक अंदाजानुसार, वीज मीटरला आग लागल्यामुळे इमारतीला आग लागली. तर येथील रहिवाशांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथे बंगाली लोकांचा सोन्याचे दागिने तयार करण्याचा व्यवसाय होता. यामुळे ही आग लागली असण्याची शक्यता आहे.
आगीचे स्वरूप भीषण होत गेल्यावर आझाद मैदान ते काळबादेवी भागातील वाहतूक थांबवण्यात आली होती. यामुळे या परिसरात वाहनांची गर्दी झाली होती. यामुळे काही महापालिका अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी चालत यावे लागले. बघ्यांच्या गर्दीमुळे मदतकार्यात अडचणी येत होत्या.
जुन्या इमारतींचे आव्हान
सी वॉर्डमध्ये ५ हजार जुन्या इमारती आहेत. यापैकी २ हजार इमारती या १०० वर्षांहून जुन्या आहेत. या इमारतींमध्ये कोणते व्यवसाय चालतात यावर महापालिका लक्ष ठेवते. पण, अधिक जुन्या इमारतींत नक्की कोणते व्यवसाय कधी सुरू होतात, याकडे लक्ष ठेवणे तसे कठीण जाते. अनेक इमारती जवळ-जवळ असल्याने आपत्कालीन परिस्थितीत मदत करणे कठीण जाते, अशी माहिती महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
आग विझविण्यासाठी आलेल्या बंबांपैकी एकच बंब एकावेळी आत जाऊ शकत होता. आगीने भीषण स्वरूप धारण केल्यावर बघ्यांची गर्दी वाढली होती. रविवारी दुपारीही डेब्रिज उचलण्याचे काम सुरू असताना लोक पाहायला येत होते. फोटो काढत होते.
पालिकेचे अधिकारी आणि अग्निशामक दलाचे जवान
२४ तास या ठिकाणी कार्यरत होते. त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण आणून ती पूर्ण विझवता आली.