Join us  

VIDEO: मानखुर्दमध्ये झोपडपट्टीत भीषण आग; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 7:40 AM

मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडच्या शेजारी असणाऱ्या स्क्रॅप कंपाऊंडमध्ये भीषण आग

ठळक मुद्देमानखुर्द-घाटकोपर लिंक रोडच्या शेजारी असणाऱ्या स्क्रॅप कंपाऊंडमध्ये भीषण आगअग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी; आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरूआग लागण्यामागचं कारण अद्याप स्पष्ट; सुदैवानं जीवितहानी नाही

मुंबई: मानखुर्दमधील मंडला परिसरातील झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे. मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडच्या शेजारी असणाऱ्या स्क्रॅप कंपाऊंडमध्ये लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आग लागण्यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मानखुर्दमध्ये असलेल्या स्क्रॅप कंपाऊंडला सकाळी ६ च्या सुमारास आग लागली. सुरुवातीला ही आग लेव्हल-१ ची असल्याची माहिती अग्निशमन दलानं दिली. मात्र त्यानंतर आगीनं रौद्र रुप धारण केलं. त्यानंतर ही आग लेव्हल-३ ची असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली. स्क्रॅप करण्यात आलेल्या वस्तू आणि तेलाचे वापरलेले डबे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत. या भागात १५ हजार चौरस फूटांवर ५ स्क्रॅप गोडाऊन आहेत. वाऱ्याचा वेग अतिशय जास्त असल्यानं आग पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे अग्निशमन दलाचे जवान प्रयत्नांची शर्थ करत आहेत. सध्या तीन फायर फायटिंग जेट्स घटनास्थळी आहेत. याशिवाय सहा फायर इंजिन, दोन फोम टेंडर, पाच जंबो टँकर, तीन वॉटर टँकर आणि एक रुग्णवाहिकादेखील घटनास्थळी पोहोचली आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.

टॅग्स :आग