Join us  

आता गर्दीची चिंता नको, मतदान केंद्र शोधा बिनधास्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 11:01 AM

यंदाचा वाढता उन्हाळा लक्षात घेता गर्दीचे व्यवस्थापन केले जाणार आहे.

श्रीकांत जाधव, मुंबई :मुंबई उपनगरात आता मतदान केंद्र शोधणे सोपे होणार आहे. गर्दी टाळण्यासाठी मतदारांना वेगवेगळ्या बूथप्रमाणे रंगीत मतदान चिठ्ठी दिली जाणार आहे. यंदाचा वाढता उन्हाळा लक्षात घेता गर्दीचे व्यवस्थापन केले जाणार आहे.

मुंबई उपनगरात लोकसभेचे ४ तर एका मतदारसंघाचा अंशत: समावेश आहे. त्यात विधानसभेच्या २६ मतदारसंघांचा समावेश आहे. जिल्ह्यात ७३ लाख ९३ हजार ७२४ मतदार आहेत. त्यांच्यासाठी ७ हजार ३८० मतदान केंद्रे आहेत. यापैकी जवळपास ८० टक्के मतदान केंद्रांवर पाचपेक्षा जास्त मतदान केंद्र असतात. मतदानावेळी केंद्र शोधताना गर्दीत मतदारांची घालमेल होते.  मतदान केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी प्रथमच जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली गर्दीचा व्यवस्थापन कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी लोकसभेच्या निवडणुकीपासून केली जाणार आहे.

रंगीत मतदान चिठ्ठी देणार-

७,३८० केंद्रांपैकी जिथे ५ पेक्षा जास्त मतदान केंद्र आहेत, तिथे प्राधान्याने व्यवस्थापन केले जात आहे.  प्रत्येक केंद्राला लाल, पिवळा, हिरवा, निळा, पांढरा असे रंग आणि नंबर दिला जाईल. त्या केंद्रावरील मतदारांना बूथच्या रंगाप्रमाणे रंगीत मतदान चिठ्ठी दिली जाणार आहे. जेणेकरून गर्दीतसुद्धा लगेच रंग पाहून आपले मतदान केंद्र शोधणे शक्य होईल.

यंदा मुंबईतील मतदान उन्हाळ्यात २० मे रोजी आहे. सध्याचा वाढता उष्मा पाहता मे महिन्यात अधिक उकाडा असू शकतो. अशात मतदान केंद्रावर गर्दी वाढल्यास अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यादृष्टीने मतदान केंद्रावरील गर्दीचे व्यवस्थापन केले जाणार आहे. याचा फायदा मतदारांना होणार आहे - राजेंद्र क्षीरसागर, जिल्हाधिकारी, उपनगर तथा जिल्हा निवडणूक अधिकारी

अशा आहेत सोयीसुविधा-

१) मतदान केंद्रात प्रवेशाचा आणि बाहेर जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग

२) केंद्राच्या प्रवेशद्वारावर माहिती देणारे केंद्र

३) वृद्ध, दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर

४)  पिण्याच्या पाण्याची सोय

५) स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष

६)  विशिष्ट रंगाचे दिशादर्शक

टॅग्स :मुंबईलोकसभा निवडणूक २०२४मतदान