कर्करुग्णांना त्यांच्या जिल्ह्यातच उपचार मिळण्याचा मार्ग माेकळा, ‘महाराष्ट्र कॅन्सर केअर फाउंडेशन’ येणार मदतीला
By संतोष आंधळे | Updated: May 22, 2025 14:14 IST2025-05-22T14:14:00+5:302025-05-22T14:14:44+5:30
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, कॅन्सरचे निदान वेळेत होऊन उपचार मिळाल्यास रुग्ण त्याला चांगला प्रतिसाद देतात. त्यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता कमी होते. सध्या या आजरावर प्रामुख्याने टाटा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. मात्र, यापुढे सरकारी रुग्णालयेसुद्धा कॅन्सरवरील उपचारांना प्राधान्य देणार आहेत.

कर्करुग्णांना त्यांच्या जिल्ह्यातच उपचार मिळण्याचा मार्ग माेकळा, ‘महाराष्ट्र कॅन्सर केअर फाउंडेशन’ येणार मदतीला
मुंबई : गेल्या काही वर्षांत कॅन्सरच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे कॅन्सरवरील उपचार वेळेत मिळावेत, यासाठी महापालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग काम करीत आहे. त्यासोबतच आता वैद्यकीय शिक्षण विभागानेसुद्धा कंबर कसली आहे. ‘आसाम कॅन्सर केअर फाउंडेशन’च्या धर्तीवर कॅन्सर रुग्णांना आपल्या जिल्ह्यातच उपचार मिळावेत, यासाठी ‘महाराष्ट्र कॅन्सर केअर फाउंडेशन’ संस्था स्थापन करण्यात येणार आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, कॅन्सरचे निदान वेळेत होऊन उपचार मिळाल्यास रुग्ण त्याला चांगला प्रतिसाद देतात. त्यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता कमी होते. सध्या या आजरावर प्रामुख्याने टाटा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. मात्र, यापुढे सरकारी रुग्णालयेसुद्धा कॅन्सरवरील उपचारांना प्राधान्य देणार आहेत.
महाराष्ट्र कॅन्सर केअर फाउंडेशन तयार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
शासनाच्या १०० दिवस कार्यक्रमातील वैद्यकीय शिक्षण विभागाचा हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मान्यता मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मान्यता मिळाल्यानंतर या फाउंडेशचे काम सुरू होणार आहे.
आसाम कॅन्सर केअर फाउंडेशन...
‘आसाम कॅन्सर केअर फाउंडेशन’ ही संस्था आसाम सरकार आणि टाटा ट्रस्ट यांच्या सहकार्याने डिसेंबर २०१७ मध्ये स्थापन करण्यात आली. या संस्थेचा उद्देश राज्यात प्रथमच तीन-स्तरीय कॅन्सर ग्रिड तयार करणे असा होता.
टाटा ट्रस्ट आणि आसाम सरकारने एकत्रितपणे रचना करून रुग्ण-केंद्रित कॅन्सर संस्थांची स्थापना करून फाउंडेशन तयार केले. जेणेकरून रुग्णांना त्यांच्या घराजवळ दर्जेदार आणि परवडणारे
उपचार मिळू शकतील. या फाउंडेशनचा आसाममधील सुमारे ५० टक्के कॅन्सर रुग्णांना लाभ होत आहे.
आरोग्य विभागाच्या जिल्हा रुग्णालयात कॅन्सरचे निदान करून उपचार देण्याची व्यवस्था निर्माण करणे. अत्याधुनिक उपचारासाठी टाटा रुग्णालयात पाठवणे. कॅन्सरग्रस्तांना उपचाराचा सर्वाधिक लाभ जिल्ह्यातच मिळावा, यासाठी नवीन सुविधा डिझाइन करणे आणि त्यांचे नियोजन व आधुनिकीकरण करणे, हा या फाउंडेशनचा मुख्य उद्देश आहे. यासाठी टाटा ट्रस्टचे सहकार्य घेण्यात येणार आहे. तसेच उपचारासाठी त्रिस्तरीय रचना करण्यात येणार आहे. याचे सविस्तर धोरण तयार करण्यात येत आहे.
हसन मुश्रीफ, मंत्री, वैद्यकीय शिक्षण विभाग
असे फाउंडेशन असणे चांगली गोष्ट आहे. मात्र, कॅन्सर रुग्णांना परिपूर्ण उपचार मिळतील याची काळजी घेतली पाहिजे. रुग्णांना त्यांच्या उपचारांच्या पहिल्याच टप्प्यात योग्य आणि चांगले उपचार मिळणे गरजेचे आहे. अन्यथा पहिल्या टप्प्यात उपचार योग्य पद्धतीने न मिळाल्यास गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे.
डॉ. श्रीपाद बणावली, संचालक (शैक्षणिक), टाटा मेमोरियल सेंटर