Join us  

लाँकडाऊन काळातील अन्नदान आणि मदतीला आर्थिक ग्रहण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2020 6:28 PM

अनेक ठिकाणची अन्नछत्र झाली बंद , राजकीय नेत्यांच्या चुली थंडावल्या; वैद्यकीय कर्मचा-यांसाठी दिलेल्या हाँटेलांचा खर्च गेला आवाक्याबाहेर

 

मुंबई : कोरोना लढ्याचा मुकाबला करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था, राजकीय नेते, व्यावसायिक आणि दानशूर व्यक्तींनी अन्नदानाचा यज्ञ अहोरात्र धगधगत ठेवला होता. काही हाँटेल व्यावसायिकांनी तर वैद्यकीय कर्मचा-यांच्या वास्तव्यासाठी आपल्या हाँटेलचे दरवाजे खुले केले होते. परंतु, ४० दिवसांनंतर या मदतीला आता आर्थिक अरिष्टाचे ग्रहण लागले आहे. दीर्घ काळ हा खर्च करणे शक्य होत नसल्याने अनेक ठिकाणच्या अन्नछत्रांची चूल थंडावली आहे. तर, भरमसाठ वीज बिलांचा शाँक लागल्याने येत्या काही दिवसांत हाँटेलांची दारे वैद्यकीय कर्मचा-यांसाठी बंद होण्याची चिन्हे आहेत.       

लाँकडाऊनच्या काळात पहिले ४० दिवस आम्ही रोज तीन हजार लोकांना अन्न पुरवठा देत होतो. रोज किमान ६० हजार रुपये खर्च व्हायचा. अन्नदानाच्या कंटेनरसाठी रोज १२ हजार रुपये लागायचे. तर, एवढ्या लोकांचे जेवण करण्यासाठी रोज दोन सिलिंडरही कमी पडायचे. मोठ्या तळमळीने गोरगरीबांसाठी ही काम आम्ही करत होतो. आजवर २० लाखांपेक्षा जास्त खर्च झाला. यापुढे हा भार पेलणे शक्य नसल्याने पाच मे पासून अन्न वाटप बंद केल्याची माहिती एका प्रतिथयश हाँटेल व्यावसायिकाने दिली.

अनेक राजकीय नेत्यांनीसुध्दा अन्न वाटपाच्या कामातून माघार घेतल्याचे दिलसे. स्वयंसेवी संस्था दीर्घ काळ ही मदत करू शकत नसल्याने त्यांनाही नाईलाजास्तव हात आखडते घ्यावे लागले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अन्नदानाचे काम करताना काही जणांना कोरोनाची लागण झाली असल्याने अनेकांवर भीतीचे सावट आहे. त्यामुळेसुध्दा या मदतीत खंड पडल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अन्न वाटपाचे प्रमाण निम्म्यावर आल्याचेही या कामांवर राबणा-या लोकांचे म्हणणे आहे. मात्र, या सा-या संकटानंतरही काही दानशूरांनी आपल्या कामात खंड पडू दिलेला नाही.

-------------------------------------

हाँटेलचे वीज बिल न परवडणारे

ठाण्यातील एका हाँटेल व्यावसायिकाने आपली तीन हाँटेलांमधिल रुम वैद्यकीय कर्मचा-यांच्या वास्तव्यासाठी खुल्या करून दिल्या होत्या. दूर अंतरावर राहणा-या या कर्मचा-यांना दररोज प्रवास करावा लागू नये आणि त्यांचे कुटुंबियांना दुर्देवाने प्रादुर्भाव होऊ नये ही त्यामागची भावना होती. मात्र, या वास्तव्यामुळे गेल्या महिन्यांतील विजेचे बिल आठ लाख रूपये आले आहे. हे बिल भरले परंतु, पुढील महिन्यांत तो खर्च करणे शक्य होणार नाही. त्यामुळे १७ मे नंतर इथे वास्तव्याला असलेल्या या कर्मचा-यांची अन्यत्र व्यवस्था करावी अशी विनंती करणारे पत्र ठाणे महापालिका आयुक्तांना पाठविल्याचे या हाँटेलांच्या मालकाने लोकमतशी बोलताना सांगितले. 

टॅग्स :अन्नकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस