अखेर अग्निशमन दलास आली जाग
By Admin | Updated: April 12, 2015 01:58 IST2015-04-12T01:58:05+5:302015-04-12T01:58:05+5:30
वायरलेस यंत्रणेसाठी केंद्रीय दूरसंचार मंत्रालयास देय असलेले कोट्यवधींचे परवाना शुल्क तब्बल चार वर्षांनंतर पालिकेने भरले.

अखेर अग्निशमन दलास आली जाग
मुंबई : वायरलेस यंत्रणेसाठी केंद्रीय दूरसंचार मंत्रालयास देय असलेले कोट्यवधींचे परवाना शुल्क तब्बल चार वर्षांनंतर पालिकेने भरले. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली़ त्यानंतर वेगाने चक्रे फिरली व थकलेली रक्कम भरण्यासाठी अग्निशमन अधिकाऱ्यांनी नुकतीच दिल्लीवारी केली़
आपत्तीच्या काळात संपर्काच्या सर्व यंत्रणा फेल गेल्यानंतर महत्त्वाचे संदेश पोहोचवून मदतकार्याला गती देण्यात वायरलेस यंत्रणेची मोठी भूमिका असते़ मात्र या यंत्रणेचा वापर करण्यासाठी देय असलेले परवाना शुल्कच २०११ पासून भरण्यात आलेले नाही़ यामुळे केंद्रीय दूरसंचार मंत्रालय या संपर्क यंत्रणेचे दोर कापणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते़
‘आपत्ती काळात संपर्क दोर तुटण्याचा धोका’ या मथळ्याखाली प्रसिद्ध वृत्तानंतर जागे झालेल्या प्रशासनाने अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत तत्काळ थकीत रक्कम भरण्याचे आदेश दिले़ त्यानुसार २६ मार्च रोजी अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिल्लीला जाऊन केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाकडे थकीत परवाना शुल्क भरले़ (प्रतिनिधी)
अग्निशमन दलामध्ये
१९६० पासून संपर्कासाठी बिनतारी यंत्रणा वापरली जाते़ यासाठी अग्निशमन दलास दूरसंचार मंत्रालयाकडे वार्षिक
५५ लाख रुपये भरावे लागतात़
मात्र २०११ ते २०१५ या चार वर्षांमध्ये परवाना शुल्कापोटी देय रक्कम अग्निशमन दलाने भरली नव्हती़ त्यामुळे दूरसंचार मंत्रालयाने दोन कोटी रुपये थकाबाकीबरोबरच ३३ लाख रुपये दंड भरण्याचा आदेश दिला होता़